मुंबई, 11 नोव्हेंबर 2022
मेक्सिको हा देश तेथील चैतन्यपूर्ण संस्कृतीसाठी आणि अनेक पदरी इतिहासासाठी सुप्रसिद्ध आहे. या देशाच्या सतत वाढत्या सांस्कृतिक वारशामध्ये चित्रपट निर्मितीचा देखील समावेश आहे. अलेजान्द्रो गोन्झालेझ इनारितू, गुलेर्मो डेल तोरो, अल्फोन्सो क्वारोन आणि कार्लोस रेगादस यांच्यासारख्या प्रतिभावंतांनी जागतिक दर्जाच्या अनेक चित्रपटांची निर्मिती करुनआंतरराष्ट्रीय पातळीवरील समीक्षकांची वाहवा मिळवली आहे. थोड्याच काळात आपल्या भेटीला येणाऱ्या 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये देखील मेक्सिकोची संस्कृती आणि त्यांचे चित्रपट यांचा उत्सव साजरा करण्यात येणार असून विविध विभागांमध्ये एकूण 7 मेक्सिकन चित्रपट सादर होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात ‘रेड शूज’ हा वर्ष 2022 मधील मेक्सिकन चित्रपट इतर 14 चित्रपटांसह स्पर्धेत असेल. या विभागातील विजेत्या चित्रपटाला मानाच्या सुवर्ण मयूर पारितोषिकाने सन्मानित करण्यात येईल. कार्लोस आयचेलमन कैसर दिग्दर्शित ‘रेड शूज’ हा चित्रपट अलिप्त जीवन कंठणाऱ्या एका शेतकऱ्याची कथा सांगतो. मुलीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर तिचे पार्थिव घरी आणण्यासाठी प्रयत्न करताना हा शेतकरी अनोळखी आणि उपऱ्या जगात कसा वावरतो याचे वर्णन चित्रपटात पुढे दिसते. या चित्रपटाला मिळालेल्या विविध नामांकनापैकी, व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेले प्रेक्षक पसंतीचे पारितोषिक वादाच्या भोवऱ्यात होते.
‘रेड शूज’ मधील दृश्य
तसेच, अॅन मेरी श्मिट आणि ब्रायन श्मिट यांचे दिग्दर्शन असलेला ‘आयलंड ऑफ लॉस्ट गर्ल्स’ हा चित्रपट ‘पदार्पणातील सर्वोत्तम फिचर दिग्दर्शक’ पुरस्कारासाठी स्पर्धेत आहे. हा चित्रपट सागरी गुहेत अडकलेल्या आणि राक्षसी लाटा तसेच अलौकिक प्राण्यांशी झुंज देणाऱ्या तीन बहिणींची थरारक कथा सांगतो. मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तसेच फँटासिया महोत्सवामध्ये देखील हा चित्रपट सादर करण्यात आला होता.
‘आयलंड ऑफ लॉस्ट गर्ल्स’ मधील दृश्य
ब्लांक्विटा, सोल्स जर्नी, ईआमी, पिनोशियो आणि हुसेरा हे आणखी काही मेक्सिकन चित्रपट देखील 53 व्या इफ्फीमध्ये सादर होणार आहेत.
इफ्फीविषयी थोडेसे
वर्ष 1952 पासून सुरु झालेला इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आशियातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे. चित्रपट निर्मिती, त्यांतील कथा आणि या निर्मितीमध्ये गुंतलेल्या व्यक्ती यांचा उत्सव साजरा करणे ही या महोत्सवाच्या आयोजनामागील संकल्पना आहे. या महोत्सवाद्वारे आपण समाजात मोठ्या प्रमाणात आणि सखोलपणे चित्रपटांविषयीचे सजग कौतुक आणि उत्कट प्रेम जोपासून, वाढवून त्याचा प्रसार करण्याचा, आपापसात प्रेम,समजूतदारपणा आणि बंधुत्व यांचे सेतू बांधण्याचा आणि त्यांना व्यक्तिगत तसेच सामूहिक उत्कृष्टतेची नवी उंची गाठण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो.
या महोत्सवाचे यजमान राज्य असलेल्या गोव्याच्या सरकारच्या एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे दर वर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.या वर्षी आयोजित होत असलेल्या 53 व्या इफ्फी महोत्सवाविषयीची सर्व अद्ययावत माहिती, उत्सवाच्या www.iffigoa.org या संकेतस्थळावर, पत्रसूचना कार्यालयाच्या pib.gov.in या संकेतस्थळावर तसेच इफ्फीचे ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम या समाज माध्यम मंचांवर तसेच गोव्याच्या पत्रसूचना कार्यालयाच्या समाज माध्यम स्थळांवर उपलब्ध आहे. लक्षात असू द्या, चित्रपटांच्या सोहोळ्याचा भरभरून आनंद घेऊया आणि एकेमकांना त्यात सहभागी करून घेऊया.