मुंबई-सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी मुंबईत सोमवारी दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर, भारती मंगेशकर, ह्दयेश आर्ट्सचे अविनाश प्रभावळकर उपस्थित होते. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईत षण्मुखानंद सभागृहात उषा मंगेशकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील, अशी माहिती पं. मंगेशकर यांनी दिली.ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री आशा पारेख, अभिनेते जॅकी श्राॅफ यांना चित्रपट कारकिर्दीसाठी तसेच गायक राहुल देशपांडे यांना संगीत क्षेत्रातील कारकिर्दीसाठी दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार या वर्षीपासूनच सुरू करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. ‘पुण्यात मंगेशकर रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी मोदी आले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी देशाचे पंतप्रधान होतील, असे तेव्हा लतादीदी म्हणाली होती. तिचे शब्द सत्यात उतरले. मोदी यांनी केलेल्या सर्वोत्कृष्ट देश आणि जनसेवेसाठी पहिला पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे, असे मंगेशकर यांनी स्पष्ट केले. अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये मुंबईचे डबेवाले (नूतन मुंबई टिफीन चॅरिटेबल ट्रस्ट) तसेच दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते श्रीपाद पद्माकर यांचा समावेश आहे, अशी माहितीही हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी दिली.