पुणे- ‘गंगाजल’ हा माझा अखेरचा हिंदी चित्रपट होता. आता मी चोखंदळ झालो असून मराठीमध्येही काही दिवसांनी कदाचित थांबेन, असे वाटते.’असे सांगत ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांनी येथे अभिनय निवृत्तीचे सूतोवाच केले .
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद पुणे शाखेतर्फे संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जोशी आणि युवा दिग्दर्शक मोहित टाकळकर यांचा ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे आणि नाटय़ परिषद पुणे शाखेचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचा सत्कार करण्यात आला. परिषदेचे उपाध्यक्ष उल्हास पवार, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, नाटय़ परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे या वेळी उपस्थित होते. राजेश दामले, सुहासिनी देशपांडे आणि ज्योती चांदेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून मोहन जोशी यांचा कलाप्रवास उलगडला.
जोशी म्हणाले,‘नवी पेठेतील वाडय़ामध्ये भोंडला, गाण्याचे कार्यक्रम आणि नाटकामध्ये मी हिरीरीने सहभाग घेत असे. हे निदर्शनास येताच वडिलांनी भरत नाटय़ मंदिर येथे पाठविले. तेथे मी शालेय वयात असल्यापासूनच नाटकात काम करू लागलो. बीएमसीसीतून पदवी घेतली. मात्र, पैसे कमावण्याच्या उद्देशातून मी वाहतुकीचा व्यवसाय करू लागलो. अनेकदा मी ट्रकचालक म्हणून काम केले होते. मात्र, एका अपघातामध्ये मी जायबंदी झालो आणि नंतर अपघातानेच नाटय़ व्यवसायात आलो. अभ्यासात हुशार नसलेल्या मुलांच्या अंगामध्ये कलागुण असतात. मराठी नाटक, चित्रपटांतून काम करतानाच हिंदूी चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेद्वारे पदार्पण झाले. अडीचशे चित्रपट केल्यानंतर त्याच त्याच भूमिका करायचे काम थांबविले. ‘गंगाजल’ हा माझा अखेरचा हिंदी चित्रपट होता. आता मी चोखंदळ झालो असून मराठीमध्येही काही दिवसांनी कदाचित थांबेन, असे वाटते.’
मराठी नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि हिंदी चित्रपट अशा सर्वच माध्यमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारता आल्यामुळे आजवरच्या कारकिर्दीबाबत मी समाधानी आहे. काही करायचे राहून गेले असे वाटत नसल्याने सध्या मी निवडक भूमिकाच करीत आहे. काही दिवसांनी कदाचित मी थांबेन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली .