पुणे:“जय जवान-जय किसान नार्याबरोबर आता जय वारकरी हा नारा देणे गरजेचे आहे, कारण यामुळे आपल्या देशातील अध्यात्माचा प्रसार हा संपूर्ण विश्वात होईल. देशातील वारकरी-पैलवान बलवान असतील तर आपला देशही बलवान होईल.,”असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ रमेश ठाकरे यांनी येथे केले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर विकास समिती, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वाखरी, पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी, विश्वशांती गुरूकुल परिसरात वारकरी भाविक भक्तांसाठी आषाढी वारीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा’च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मा. ना. श्री. बबनरावजी पाचपुते, महान भारत केसरी पै. दादू चौगुले, हिंद केसरी पै. गणपत आंदळकर, हिंद केसरी पै. दीनानाथ सिंग हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, नाशिक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अरूण जामकर, एमआयटीचे कुलगुरू डॉ. रॉय, रूई रामेश्वरचे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी श्री.काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटी, लातूर येथील माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड, वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितीचे विश्वस्त श्रीकांत देशमुख , संयोजन समितीचे सचिव विलास कथुरे, हिंद केसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी नामदेव मुळे व संभाजी पाटील आदी उपस्थित होते.
रमेश ठाकरे म्हणाले,“ मेंदू, मन व मनगट बळकट करणार्या कुस्तीला राजाश्रय देण्याचे काम डॉ.विश्वनाथ कराड यांच्या माध्यमातून होत आहे. देशाच्या रक्षणासाठी बलवान तरूणांची गरज आहे. येथे आयोजित कुस्ती स्पर्धेतून बलवान तरूणांची फळी तयार करण्याचे काम होत आहे., ”
महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री बबनरावजी पाचपुते म्हणाले, “आळंदी, देहूचा ज्या प्रकारे कायापालट झाला आहे. त्याच प्रकारे आता पंढरपूर येथील चंद्रभागा नदी तीराचा कायापालट डॉ.विश्वनाथ कराड यांनी करावा. संपत्ती आणि दया जिथे असेल तिथे देवस्वरूप विभूती जन्माला येतात. शैक्षणिक व अध्यात्मिक कार्य करणारे डॉ.कराड आज त्याचेच प्रतिरूप आहेत. युनोमध्ये संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू संत तुकाराम यांचे छायाचित्र लावण्यात त्यांचेच योगदान आहे. शिवाय त्यांनी वारकरी संप्रदायासाठी केलेले कार्य मौल्यवान आहे. ”
प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“छत्रपती शिवरायांनी दाखविलेल्या मार्गावरून चालल्यास स्वराज्य आणि सुराज्य अनुभवता येईल. समाजाला शिवरायांच्या मार्गावरून चालण्याची दिशा दाखविण्याचे व समाजामध्ये सुख, शांती, समाधान राखण्याचे दायित्व वारकरी संप्रदायावर आहे. धर्म म्हणजे स्वत:चे कर्तव्य निभावणे होय. भारतीय अस्मिता जागविण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे. शिवरायांच्या काळात वारकरी-धारकरी व मावळ्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. असा युगपुरूष आता होने नाही. आपण सर्व छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याने त्यांनी दाखविलेल्या स्वराज्याच्या मार्गाने वाटचाल करावयाची आहे. त्यासाठी जाती धर्माच्या पलिकडे जाऊन भारतीय अस्मिता जागविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ”
येवला येथील दिंडीतील दशरथ बोराडे व उस्मानाबाद येथील स्वामी समर्थ दिंडीतील उमेश कारभारे यांच्यात उदघाटनाची कुस्ती झाली. त्यामध्ये दशरथ बोराडे हे विजयी झाले. श्रीकांत देशमुख यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले. शंकरअण्णा पुजारी व किसन बुचडे यांनी सूत्र संचालन केले.
वारकर्यांसाठी मोफत आरोग्यसेवा
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथील माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातर्फे वारीत आलेल्या वारकर्यांसाठी वाखरी तळावार मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली. वारीत चालून आलेल्या हजारो वारकर्यांना आराम मिळावा, यासाठी औषधे, गोळ्या, इंजेक्शन आदी मोफत देण्यात आले. तसेच आरोग्य तापसणी करण्यात आली. याचा अनेक वारकर्यांनी लाभ घेतला. वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका यामध्ये मोठ्या भक्तीभावाने वारकर्यांची सेवा करीत आहेत.
वीणेकरी, दिंडीप्रमुखांचा सत्कार
राज्यभरातून ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीसोबत आलेल्या सर्व दिंड्यांचे प्रमुख, त्यातील वीणेकरी व तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकर्यांचा विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते माऊलींची व तुकोबांची प्रतिमा, पसायदान, महावस्त्र, हार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या ठिकाणी लावण्यात आलेल्या लोकशिक्षणपर कार्यक्रमाची चित्रफीत पाहून वारकरी भारावले.
अन्नपूर्णा सदनातर्फे महाप्रसादाचे वाटप
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या ज्येष्ठ भगिनी पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड यांच्या नावे असलेल्या अन्नपूर्णा सदनाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातून आलेल्या वारकर्यांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. लाखो वारकर्यांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली रमेशअप्पा कराड यांनी या महाप्रसाद वाटपाचे नियोजन केले.