मुंबई : ईडीनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी त गेलेल्या एकनाथ खडसेंना मोठा झटका दिला आहे. एकनाथ खडसें चे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावाई गिरीश चौधरी हे सध्या ईडीच्या अटकेत आहेत.
गिरीश चौधरी यांना ईडीने रात्री अटक केल्याचं आज सकाळी जाहीर केलं. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता एकनाथ खडसे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता.
एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?, असा सवाल खडसेंनी केला होता.