पुणे- लवकरच डीएसके पुन्हा उभे राहिलेले दिसतील…पहा डीएसके यांनी काय म्हटले आहे त्यांच्याच शब्दात …
माझ्याविरूध्द 420 व 406 कलमे लावणार्यांना आज न्यायालयाने चांगली चपराक दिली आहे. डीएसकेंनी फ्लॅट देण्यात उशीर केला व प्रॉव्हिडंड फंड वेळेत जमा केला नाही या कारणांचं निमित्त करून या मूठभर दुष्ट लोकांनी दावा लावला, तोही फसवणुकीचा ! कारण यांचा हेतू एकच – डीएसकेंना अटक व्हावी. पण सत्याचा वाली परमेश्वर. मी आजपर्यंत कुणाला फसवलेले नाही आणि पुढेही नाही. हे न्यायालयाच्याही लक्षात आले आणि माझ्याविरूध्द रचलेला हा कट कायद्याच्या परड्यात मात्र शिजला नाही. आज मा. कोर्टाने ही दोन्ही कलमे फेटाळत या विघ्नसंतोषी लोकांना सणसणीत चपराक देत मला जामीन मंजूर केला आहे. या निवेदनाद्वारे मी या मूठभर दुष्टांना सांगू इच्छितो की तुमचे हे दुष्ट हेतू मी, माझे कर्मचारी व माझे ग्राहक कधीही सफल होऊन देणार नाहीत. आज 98% फ्लॅटधारकांचा व मोठ्या संख्येतील ठेवीदारांचा माझ्यावर पूर्ण विश्वास असून ते माझ्या बाजूने उभे आहेत. हा विश्वास सार्थ करत मी लवकरच या लोकांना घरांचा ताबा देणार आहे. जगभरातून मला वाढता पाठिंबा मिळत आहे. माझ्यावर प्रेम करणारे चाहते ‘डीएसके, हा आमचा खारीचा वाटा’ म्हणत जमेल तशी रक्कम देत आहेत. याशिवाय फंड्सही उभे रहात आहेत. लवकरच डीएसके पुन्हा उभे राहिलेले दिसतील. उत्कृष्ट सेवेसाठी जगभरात नावाजल्या गेलेल्या डीएसके मोटर्सच्या सर्व शोरूम्सचा पुन्हा त्याच दिमाखात शुभारंभ होत आहे. यानिमित्ताने ठेवीदारांनाही मी आवाहन करतो की आत्तापर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी आहातच. अाता फक्त थोडे दिवस…मग पाहा, चांगले दिवस पुन्हा आलेले दिसतील. आणि विघ्नसंतोषी लोकांनो, आता तरी या माकडचेष्टा थांबवा. तुमच्यामुळे माझा वेळ व पैसा विनाकारण वाया जातोय शिवाय ठेवीदारांना पैसे व फ्लॅटधारकांना फ्लॅट देण्यातही तुमच्या या भाकड कारवायांमुळे उशीर होत आहे.
-डी. एस. कुलकर्णी