पुणे- निवडणुकीचे काम करतांना गोंधळून जाऊ नका, तुमच्या कार्यक्षमतेवर आमचा विश्वास आहे, पण तुमचा स्वत:वर विश्वास असला पाहिजे, अशा शब्दांत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी क्षेत्रीय अधिका-यांचा उत्साह वाढवला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सी-विंगमधील नवीन सभागृहात क्षेत्रीय अधिका-यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम, बारामतीचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष डुंबरे, निवडणूक निरीक्षक रजत अग्रवाल, पोलीस ऑब्झर्व्हर आयुष मनी तिवारी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील, समन्वय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना पडियार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, तज्ञ आशीष चौधरी, उपायुक्त निलीमा धायगुडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदींची उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, निवडणूक सहजतेने घेऊ नका, निवडणुकांचा अनुभव असला तरी यावेळी व्हीव्हीपॅट यंत्रामुळे त्याचे अद्ययावत ज्ञान असणे आवश्यक आहे. इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची हाताळणी योग्य पध्दतीने करा. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे निवडणुका शांत वातावरणात पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, निवडणुकीच्या कामावरील कर्मचा-यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आलेआहे. काही शंकाअसतील तर त्याचे आत्ताच निराकरण करुन घ्या, ऐनवेळी गोंधळ निर्माण व्हायला नको. मतदान यंत्रांची हाताळणी करतांना काळजी घेतली पाहिजे.प्रशिक्षणामध्ये ज्याक्रमाने जोडणी सांगितली आहे, त्या पध्दतीने झाली पाहिजे. निवडणूक निरीक्षक रजत अग्रवाल यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी समन्वय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना पडियार आणि तज्ञ आशीष चौधरी या दोघांनी उपस्थित कर्मचारी-अधिका-यांना मतदान यंत्रांबाबतची पुन्हा एकदा माहिती दिली तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले.