पुणे, – राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यासाठी अद्याप जागा निश्चित केलेली नसल्यास येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण करुन याबाबतची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनाला सादर करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्याची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. राव यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी त्यांनी ही सूचना केली. यावेळी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, पुणे विभागाच्या उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी, रोजगार हमी योजना शाखेचे उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यावेळी उपस्थित होते.
श्री. राव म्हणाले, वृक्ष लागवड करण्याबाबत वेळेत योग्य ते नियोजन करावे. सर्व विभागप्रमुखांनी या कामास प्राधान्य देवून झालेल्या कामांचा दैनंदिन आढावा घ्यावा. त्याचबरोबर नियोजित कामांची माहिती द्यावी. वृक्षारोपणाचा कार्यक्रम जिल्हयात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी या कामी विविध कंपन्या, संस्थांच्या आवारात रोपे लावण्यासाठी उद्योजकांचीही मदत घ्यावी. तसेच जिल्हयातील नद्या व उपनद्यांच्या दोन्ही बाजूंचे किनारे, रेल्वे मार्ग व रस्त्याच्या बाजूच्या जागांची उपलब्धता लक्षात घेऊन ही ठिकाणे निश्चित करावीत.
यापूर्वी करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील जीवंत रोपांची आकडेवारी मोबाईल ॲपव्दारे कशी सादर करावी याचे प्रशिक्षण सादरीकरणाव्दारे देण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सद्यस्थितीचा विभागनिहाय आढावा यावेळी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी घेतला. या बैठकीस केंद्र सरकार व राज्यशासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.