पुणे, दि.९: स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्काराच्या क्रमवारीत पुणे शहराचा क्रमांक उंचावत देशात पहिल्या पाच शहरात समाविष्ट होण्याच्यादृष्टीने नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छ्ताविषयक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित स्वच्छ तंत्रज्ञान चॅलेंज आणि स्वच्छ पुरस्कार २०२३ च्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिका स्वच्छता उपक्रमाचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. सलील कुलकर्णी, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्व लक्षात घेवून देशात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी, स्वच्छतेबाबत महत्व पटवून देण्यासाठी विविध शहरात स्पर्धा, उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून आपला परिसर, शहर, वसाहत, जिल्हा, राज्य व देश स्वच्छ होण्यास मदत होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहर देशात ९ व्या क्रमांकावर असून आपली क्रमवारी उंचावण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री पुढे म्हणाले, पुणे शहराला चांगल्या उपक्रमात पुढाकार घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे कचरा निर्मूलन तसेच व्यवस्थापनातही चांगले काम केले जात आहे. वाढती लोकसंख्या विचारात घेता शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती होते. परंतु अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया करुन जीवनाश्यक वस्तूंची निर्मिती करण्यात येत आहे. शहरातील वसाहतीत निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून खत आणि गॅस निर्मितीबरोबरच वीज निर्मिती करण्यात येत आहे. कचरा आज एक प्रकारची मालमत्ता बनली आहे. रोजगाराचे साधन बनले आहे. कचरा निमिर्तीपासून ते कचरा निर्मूलन पर्यंतचा प्रवास विचारात घेता पुणे महानगरपालिका अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यावर कार्य करीत आहे. या स्वच्छतेच्या कार्यात नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन आपले शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. पाटील यांनी नागरिकांना केले.
श्री. कुमार म्हणाले, पुणे शहरात नवीन हद्दवाढीमुळे सुमारे ६२ लाख लोकसंख्या असून शहरात दररोज सुमारे २ हजार २०० टन कचरा निर्माण होतो. महानगरपालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी पुणे शहर स्वच्छ करण्यासाठी काम करीत आहे. पुणे महानगरपालिका कचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया करण्याचे काम करते. या सर्व कार्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. १०० किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या गृहनिर्माण संस्था, हॉटेल आदीनी त्यांच्यास्तरावर कचरा निर्मूलन करण्याची प्रक्रिया करावी.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी पुणे महानगर पालिका अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. पुणे शहरातील नागरिकांनी आपल्या घरात, परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करावेत.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे आयोजित घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाचे उद्धघाटन करण्यात आले.