2 हजार 503 सदनिकांसाठी संगणकीय सोडत
पुणे– महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) राबविण्यात येणाऱ्या गृहयोजना सोडतीमध्ये पारदर्शकता असल्यामुळे या गृहनिर्माण योजनांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभतो असे प्रतिपादन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी झेंडे यांनी केले.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे विभागीय कार्यालयातर्फे 2 हजार 503 सदनिकांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या सदनिका वाटपाची संगणकीय सोडत आज येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती. या सोडतीची प्रस्तावना करताना संभाजी झेंडे बोलत होते. यावेळी माजी उपलोकायुक्त सुरेशकुमार, राष्ट्रीय सूचना केंद्राचे अधिकारी तथा संगणकीय सेाडत प्रणालीचे समन्वयक मोईझ हुसेन, कोकण परिमंडळाचे मुख्याधिकारी विजय लहाने, मुख्याधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना संभाजी झेंडे यांनी मुंबईव्यतिरिक्त प्रथमच राज्यामध्ये पुणे येथे सदनिकांसाठी संगणकीय सोडत आयोजित करण्यात येत आहे असे सांगितले. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे एकूण 2 हजार 503 सदनिकांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. सुमारे 45 हजार नागरिकांनी या योजनेला अर्जाद्वारे प्रतिसाद दिला होता. त्यापैकी सुमारे 31 हजार अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या संगणकीय सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या संकेतस्थळावर करण्यात आले. या सोडतीमध्ये सदनिकांसाठी आवेदन केलेले अर्जदार सहभागी झाले होते. संगणकीय सोडतीमध्ये भाग्यवान ठरलेल्यांची नावे एलईडी स्क्रीनवर यावेळी प्रदर्शित करण्यात आली. सोडतीमध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांचा यावेळी म्हाडाच्यावतीने सत्कार करण्यात आला. सोडतीला म्हाडाचे अधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.