मोरगाव येथील पूलाचे लोकार्पण
पुणे,दि.14 : सामाजिक बांधिलकीची जाणीव व त्याला लोकसहभागाची जोड लाभली तर अनेक पायाभूत विकास कामांची पूर्तता होण्यास हातभार लागेल असे सांगत माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांनी आज संवादपर्व अभियानांतर्गत उपस्थितांशी संवाद साधला.
मोरगाव व कऱ्हा नदीच्या पलीकडील खैरेवाडी, चांदगुडेवाडी आणि इतर पंचक्रोशीतल्या गावांना जोडणाऱ्या 110 मीटर लांबी, 4.75 मीटर रुंदी व 25 कमानींचा दिमाखदार पुलाच्या लोकार्पण सोहळयात ते बोलत होते. डोंबिवली येथील सौ.संध्याताई अमृते सार्वजनिक सेवाभावी ट्रस्टच्या सौ.संध्याताई अमृते यांच्या पुढाकारातून व लोकसहभाग, लोकवर्गणी व गणेशभक्तांच्या मदतीने सुमारे 65 लाख रुपये खर्च करु हा पूल बांधण्यात आला आहे. या पूलामुळे कऱ्हा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांचा संपर्क झाला असून शेतकरी, विद्यार्थी, भाविक, रुग्ण यांना संपर्काचे चांगले साधन मिळाले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
संवादपर्वच्या माध्यमातून बोलताना श्री.भुजबळ म्हणाले, परमेश्वर व सरकार यांवर लोकांचा नितांत विश्वास असल्याने या दोघांकडून अनेक अपेक्षा असतात. लोककल्याण हे सरकारचे कर्तव्यच आहे मात्र समाजातील दातृत्व व लोकसहभाग यातून विकासाचे पर्व उभे रहात असल्याचे या पूलाच्या बांधणीतून दिसते. हा उपक्रम स्थानिक असला तरी आदर्शवत असल्याचे सांगून श्री.भुजबळ म्हणाले, सामाजिक मंडळे, ट्रस्ट यांच्याकडे जमा झालेला समाजाचा निधी, समाजासाठी लोकोपयोगी कामासाठी उपलब्ध झाला तर अनेक वंचित गावे विकासापासून दूर राहणार नाहीत.
अमृते ट्रस्टच्या सौ.संध्याताई अमृते यांनी पूल बांधण्यामागचा उद्देश व्यक्त करुन सांगितले, अध्यात्माला सामाजिक बांधिलकी व प्रबोधनाची जोड दिल्यास लोकोपयोगी विकास कामे पूर्णत्वास जातात. नदीवर जूना पूल नसल्याने नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच भाविकांना मोठा वळसा घालून ये-जा करावी लागत होती. त्यामुळे ट्रस्टच्या माध्यमातून पूल बांधला आहे. मोरगावच्या मोरयाच्या प्रेरणेतून ही निर्मिती झाली आहे. ट्रस्ट हे निव्वळ माध्यम आहे. मोरयाची प्रेरक शक्ती, आद्यशक्ती व अंतस्फूर्ती विधायक कामांना पाठबळ देत असल्याचे सौ.अमृते यांनी सांगितले.
प्रांरभी ट्रस्टच्या सौ.अमृते व माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांच्याहस्ते पूलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोरगावचे माजी सरपंच पोपटराव तावरे, सुभाष खाकाळ, ट्रस्टचे विश्वस्त दिलीप अमृते यांची भाषणे झाली. सौ.माधुरी ताम्हणे यांनी सूत्रसंचलन केले. लोकर्पण सोहळयास मोरगावच्या सरपंच सौ.भारतीताई गायकवाड, उपसरपंच दत्तात्रय ढोले, चांदगुडेवाडीच्या सरपंच सौ.जयश्री जाधव, कुमारकाका वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप बारभाई, राम खाकाळ, सी.व्ही.कांड, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव तसेच डोंबिवली येथून आलेले गणेशभक्त व ग्रामस्थ मोठया संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.