पुणे- शहरातील रिक्षाचालकांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये तातडीने जमा करावेत. अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी व रिक्षा चालकांच्या बैठकीत केली. झूम द्वारे आयोजित केलेल्या या आभासी बैठकीला पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी व रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये नितीन पवार, बाबा शिंदे, बाळासाहेब शिंगाडे, बापू भावे, ठकसेन कोरे, अशोक सानेकर, अनंत दावे, प्रदीप भालेराव, दत्ता घुले, बाबा कांबळे, विजय डोळे ,संजय कवडे, सय्यद बादशाह, एकनाथ ढोले, श्रीकांत आचार्य ,अंकुश नवले, प्रकाश झाडे आदी मान्यवर सहभागी झाले होते.या बैठकीत बोलताना खासदार बापट म्हणाले ” की पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील रिक्षाचालकांना राज्य शासनाने पंधराशे रुपयाची मदत जाहीर केली आहे. तथापि त्याची पूर्तता करताना काही अडचणी येत आहेत. त्या समजावून घेऊन परिवहन विभागाने तातडीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी .1 मे रोजी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा मुद्दा लक्षवेधी ठरला होता. तथापि अद्यापही रिक्षाचालकांना अर्थसहाय्य मिळाले नसल्याने अनेकांची उपासमार होत आहे. उत्पन्न बंद झाल्यामुळे या रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे .म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाने तत्परतेने मदत करावी व मानधनाची रक्कम रिक्षाचालकांच्या खात्यात जमा करावी. अशी आमची मागणी आहे