पुणे : युवा शक्तीचा उपयोग समाजहितासाठी झाला पाहिजे. तुम्हाला मिळालेले नगरसेवक पद ही त्यासाठीची संधी आहे असे समजून काम करा. लोकांच्या भारतीय जनता पक्षाकडून अनेक अपेक्षा आहेत या अपेक्षांची पूर्तता करा अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. भाजप युवा मोर्चाच्या वतीने पक्षातील नवनिर्वाचित युवा नगरसेवकांचा सत्कार त्यांच्या हस्ते टिळक स्मारक येथे करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला आमदार योगेश टिळेकर, महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेता श्रीनाथ भिमाले, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, भाजप शहर युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, गणेश घोष आदींसह नवनिर्वाचित युवा नगरसेवक तसेच भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले, निवडणुका हा संघटनेच्या ताकदीचा थर्मामीटर असतो. पुढच्या निवडणुकीला अजून किमान दोन वर्षाचा वेळ आहे. या दोन वर्षांनंतर जेव्हा भाजपचा कार्यकर्ता लोकांच्याकडे जाईल तेव्हा लोक आपले स्वागत करतील असे काम करा. युवा शक्तीने एकत्रीत येवून काम केल्यास एक वेगळी ताकद निर्माण होईल. पुण्यात बाहेर गावावून येणारे अनेक विद्यार्थी आहेत जेवणापासून, त्यांच्या राहण्यापर्यन्त अनेक प्रश्न त्यांचे आहेत. महिला, जेष्ठ नागरिकांच्याही अनेक समस्या आहेत. पण ते प्रश्न सोडवणारी यंत्रणा नाही. ही यंत्रणा युवा शक्तीने राबवावी. राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. या योजना युवा ताकदीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवाव्यात. यामुळे लोकांचा पक्षावरील विश्वास आणखी दृढ होईल. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रत्येक कार्यकर्त्याने एका वर्षात किमान १० नवीन कार्यकर्ते जोडले तर हजारो कार्यकर्त्यांची फौज पुण्याच्या विकासासाठी कार्यरत राहील. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर तुम्हाला ही लोकांची कामे करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे असे ही ते म्हणाले.
यावेळी बोलताना महापौर मुक्ता टिळक यांनी भारतीय जनता पक्षाला पुणे महानगर्पलिकेत मिललेल्या यशामध्ये भाजप युवा मोर्चाचा सिंहाचा वाटा असल्याच सांगितलं. तर शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी भविष्य काळात पक्षाद्वारे राबवण्यात येणार्या कामांचे नियोजन संगितले.