औरंगाबाद-आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यानिमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहन करण्यात आले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी सर्वांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये घृणेश्वर मंदिराच्या विकासासाठी १५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यासोबत रस्ते आणि रेल्वे मार्गाने मराठवाड्याला जोडण्यासाठीची विकासकामंही वेगानं व्हावीत, यासाठी भरीव तरतूद केली असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी १३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार. जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार. मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प हाती घेणार. जालना पाणीपुरवठा नूतनीकरण. नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार. लातूरमध्ये कृषी महाविद्यालयाची तरतूद. मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
शहांच्या उपस्थित कार्यक्रम
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कार्याक्रमांनतर मुख्यमंत्री हैदराबादला रवाना झाले, तिथे अमित शहांच्या उपस्थित कार्यक्रम होणार आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामाशी संबंधित महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये एक संयुक्त कार्यक्रम होणार आहे. अमित शहा देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्त्वाखाली मुक्तिसंग्रामाचा लढा लढला गेला होता. मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे मोलं कुणीच करू शकत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.