पुणे, 17 फेब्रुवारी, 2021 : रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ (सियाम) या संस्थेने आयोजित केलेल्या ‘32व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मास’ या कार्यक्रमाचा समारोप आज झाला. ‘सडक सुरक्षा जीवनरक्षा’ अशी महिनाभर सुरू असलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना होती.
या कार्यक्रमांतर्गत सियामने महिनाभर विविध उपक्रम राबवले. या काळात ‘व्हर्च्युअल रस्ता सुरक्षा शैक्षणिक गॅलरी’ सुरू करण्यात आली. ती या संपूर्ण महिन्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. रस्त्यांच्या सुरक्षेबाबत हितसंबंधियांना आणि सर्वसामान्यांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेल्या या गॅलरीच्या माध्यमातून, रस्त्यांवरील शिस्त, वाहनचालकांच्या वर्तनातील बदल यांबाबत जागरूकता निर्माण आली व रस्त्यांवरील सुरक्षिततेच्या सर्वोत्कृष्ट पद्धतींना प्रोत्साहन देण्यात आले.
या एका महिन्याच्या कालावधीत, ‘सियाम’चे सदस्य आणि भागधारक सुमारे दहा लाख नागरिकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचले आणि त्यांनी ‘सडक सुरक्षा जीवनरक्षा’ हा संदेश सर्वांना दिला. ट्रक, बस आणि तीन चाकी वाहने यांचे चालक, तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला चालक आणि इतर नागरीक यांच्यासाठी सियाममार्फत रस्ता सुरक्षा जागरूकता आणि प्रशिक्षण उपक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली.
हा संपूर्ण कार्यक्रम सर्वांगीण ठरण्यासाठी, देशभरातील 25हून अधिक ठिकाणी वाहनचालकांसाठी सुरक्षित ड्रायव्हिंग, आरोग्य आणि नेत्र तपासणी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ‘एएसआरटीयू’च्या सहकार्याने ‘सियाम’ने देशभरातील एसटीयू चालकांसाठी रस्ता सुरक्षा जागरूकता व्हर्च्युअल कार्यशाळेचे आयोजन केले आणि 11 हजारहून अधिक वाहनचालकांना प्रशिक्षण दिले.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्यात, ‘साईट सेव्हर’ आणि ‘टीसीआय फाउंडेशन’ या संस्थांच्या सहकार्याने ‘सियाम’ने महाराष्ट्रात मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन केले. तसेच, ‘एसटीयू’ आणि व्यावसायिक वाहनचालकांसाठी रस्ते सुरक्षा जागरूकता सत्रांचे व्हर्च्युअल आयोजनही केले. वाहनचालकांना त्यांच्या आरोग्याविषयी माहिती देऊन, औषधे व चष्मा यांचे विनामूल्य वाटप यामध्ये करण्यात आले. वाहनचालकांसाठी रस्ता सुरक्षा जागरूकता सत्रे आयोजित करून, ‘सियाम’ने या चालकांना स्वत:च्या सुरक्षेसाठी आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते नियम पालनाचे महत्त्व विशद केले.
रस्ते सुरक्षा या संदर्भात इतरही अनेक जनजागृतीचे कार्यक्रम राज्यभरात घेण्यात आले. यातून सुरक्षिततेची मानके आणि वाहनांच्या रहदारीच्या नियमांविषयी लोकांना जागरूक करण्यात आले.
महिनाभर चाललेल्या रस्ता सुरक्षा कार्यक्रमादरम्यान, ‘सियाम’ने, रस्त्यांवरील सुरक्षितता वाढविण्यासाठी ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ची अंमलबजावणी आणि सुरक्षित प्रवासासाठी नवीन तंत्रज्ञान, तसेच सुरक्षिततेच्या मानकांबाबत माहिती प्रसारीत करणे, शिक्षण देणे, वाहनांच्या तंत्रज्ञानामधून सुरक्षितता आणण्याविषयी समग्र दृष्टिकोन बाळगणे, या विषयांवर दोन व्हर्च्युअल परिसंवादांचे आयोजन केले.
‘रस्ता सुरक्षा मास’ या कार्यक्रमाबाबत आपले मत व्यक्त करताना, ‘सियाम’चे महासंचालक राजेश मेनन म्हणाले, “तांत्रिक नावीन्यता व उत्तम पद्धतीं यांद्वारे वाहतूक सुरक्षित ठेवण्याबाबत सियाम कटिबद्ध आहेच, त्याशिवाय भारतीय रस्ते अधिक सुरक्षित राहावेत म्हणून जनजागृती करण्यासाठीदेखील ती वचनबद्ध आहे. एक जबाबदार संस्था म्हणून, ‘सियाम’ला सर्वांसाठी रस्ते सुरक्षिततेचे महत्त्व माहीत आहे आणि सुरक्षिततेविषयी असंख्य कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात ती मोलाचे योगदान देत आहे.”
‘सियाम’च्या व्हर्च्युअल रस्ते सुरक्षा शैक्षणिक गॅलरीमध्ये मोठ्या संख्येने आलेल्या प्रेक्षकांना व्हिडिओ व सादरीकरण यांच्या माध्यमातून रस्ते सुरक्षाविषयक माहिती देण्याकरीता, 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या महिनाभराच्या काळात, ‘सियाम’च्या भागीदार ओईएम कंपन्यांनी पुढाकार घेतला. यामध्ये अशोक लेलॅंड, हिरो मोटोकॉर्प, ह्युंदाई मोटर इंडिया, महिंद्रा अॅंड महिंद्रा, एम जी मोटर्स, स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन इंडिया व टाटा मोटर्स यांचा समावेश होता.
‘सियाम’विषयी :
भारतातील सर्व प्रमुख वाहने आणि वाहनांच्या इंजिन उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणारी ‘द सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ (सियाम) ही ना-नफा तत्वावर चालणारी सर्वोच्च पातळीवरील राष्ट्रीय संस्था आहे. भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाच्या शाश्वत विकासास पाठिंबा देण्याच्या दिशेने सियाम काम करते. वाहनांचे डिझाइन आणि निर्मिती यामध्ये भारत देश हा जगात पसंतीचे ठिकाण बनावा, असे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. भारतीय वाहन उद्योगाची स्पर्धात्मकता वाढविणे, वाहनांची किंमत कमी करणे, उत्पादकता वाढविणे आणि गुणवत्तेमध्ये जागतिक स्तर साध्य करणे, यासाठीदेखील ही संस्था काम करते.