पुणे : सुरमईचे कालवण, भरला पापलेट, खिमा दाबेली, तळलेली तुकडी, कोळंबीची खिचडी, सोड्याची खिचडी, लिप्त अशा खास सीकेपी शैलीतून तयार करण्यात आलेल्या मांसाहारी पदार्थांची रेलचेल तर कडव्या वालाचे बिर्डे, मसुराची आमटी, वडीचे सांबार, कचोरी अशा शाकाहारी अनेक लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी खास पुणेकरांना लाभत आहे. निमित्त आहे जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे भरविण्यात आलेल्या कायस्थ खाद्य महोत्सवाचे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष विनोद खोपकर आणि प्रसिद्ध कलाकार राजन भिसे यांच्या हस्ते काल या वैशिष्टयपूर्ण अशा तीन दिवसीय महोत्सवाचे उदघाटन झाले. यावेळी पल्लवी प्रधान, त्रिगुण राजे, अमेय भिसेही उपस्थित होते. ” सीकेपी म्हणजे आदरातिथ्य. खाण्यापेक्षा खायला घालणे हा कायस्थ स्त्रियांचा छंद असतो. सीकेपी मुलांपेक्षा मुली जास्त सरस असे अनेकदा म्हटले जाते. कारण अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य सीकेपी मुलांमध्ये नसते. ही मानसिकता बदलायला हवी.” असे मत खोपकर यांनी यावेळी व्यक्त केले.
कायस्थ पदार्थांमधील रुचकर, झणझणीत, खमंग, खुसखुशीत पदार्थांची गोडी चाखायची असल्यास खवय्यांनी या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी. पुरणपोळीमध्ये तेलपोळी ही अत्यंत रुचकर तोंडात टाकतात विरघळणारी पोळी. लाटताना किंचितही पीठ न घेता खास पत्र्यावर तेलाच्या सहाय्याने लाटून ही पोळी बनविली जाते. वेलची सुगंध पोळीभर एकसारखे पसरलेले सारण, सुटलेले पदर आणि रंगालाही आकर्षक ठरणारी ही तेलपोळी सर्वांचा विशेष आकर्षणाचा विषय ठरत आहे. खाद्य महोत्सवाबरोबरच हस्तकलेतीलही अनेक मोहक कलाकृतींचे दर्शन या प्रदर्शनातून घडत आहे. आकर्षक पणत्या, टी शर्टस, कुर्ता, ड्रेस मटेरियल, चित्र, शिल्प, अलंकार अशी उत्कृष्ट कलाकुसर पाहण्याची संधीही यातून पुणेकरांना लाभत आहे. यावेळी विविध स्पर्धा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून उद्या या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. या प्रदर्शानास पुण्यासह इतर शहरातूनही नागरिक मोठ्या संख्येने येऊन महोत्सवाचा आनंद लूटत आहेत.