पुणे- येथील कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रा. चेतन दिवाण यांना मानसिक आरोग्य क्षेत्र तसेच संशोधन व अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानवाधिकार- प्रखर शोध मोहीम सोसायटीच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय विशेष मानवाधिकार पुरस्काराने गौरविण्यात आले.
१० डिसेंबर या जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून राज्यमंत्री मधुकर कांबळे, येरवडा पुणे काराग्रहाचे अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय, निवृत्त ब्रिगेडीअर विजय अरोरा, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक्षक प्रसाद अक्कानौरू, पुणे दहशतवाद विरोधी पथकचे स.पो.आयुक्त भानुप्रताप बर्गे, पुणे महानगरपलीकेचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व मानवाधिकार-प्रखर शोध मोहीम सोसायटीचे अध्यक्ष अभिमन्यू गवळी आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभाग्रहामध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
मानवाधिकार- प्रखर शोध मोहीम सोसायटी ही देशपातळीवर मानवी हक्क व अधिकारांवर काम करणारी राष्ट्रीय संस्था असून संस्थेमार्फत विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी मानवाधिकार पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत असतो. यापूर्वी २००९ पासून जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, अन्ना पठारे, कामगार नेते भाई वैद्य, पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, सिने अभिनेते श्रीराम लागू, माथाडी कामगार नेते आ. नरेंद्र पाटील आदींना मानवाधिकार पुरस्काराने गौरविण्यात आले असून यावर्षी प्रा. चेतन दिवाण यांनी देशभरातील रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाच्या पुनर्वसनासाठी मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये तसेच त्यासंदर्भातील संशोधन व अध्यापन क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेने त्यांना हा मानाचा राज्यस्तरीय मानवाधिकार पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रा. चेतन दिवाण यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाठक, उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, चेअरमन सदानंद देशपांडे, सचिव एम. शिवकुमार, संचालक डॉ. दीपक वलोकर, मानद संचालक डॉ महेश ठाकूर, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.