पुणे- येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र व प्रयास या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हिंगणे – कर्वेनगर परिसरातील महिलांसाठी गर्भपिशवीच्या तोंडाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
देशातील विविध प्रकारच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता विशेषतः महिलांमध्ये वाढणाऱ्या विविध प्रकारच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी पुणे शहरामध्ये प्रयास या संस्थेने पुढाकार घेतला असून संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी महिलांसाठी गर्भपिशवीच्या तोंडाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी मोफत तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. प्रयास व कर्वे समाज सेवा संस्थेच्या कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या वतीने काल कर्वेनगर-हिंगणे-श्रमिक वसाहत या परिसरामधील महिलांसाठी तसेच कर्वे समाज सेवा संस्थेच्या कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्रास भेट देणाऱ्या सर्व महिलांसाठी याप्रकारचे मोफत तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते व त्याचा लाभ बहुतांशी महिलांनी घेतला.
कर्वे समाज सेवा संस्थेचे सचिव एम. शिवकुमार, संचालक डॉ दीपक वलोकर, कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे मानद संचालक डॉ. देवानंद शिंदे, समुपदेशक वृषाली दिवाण, समन्वयक प्रसाद कोल्हटकर व प्रयास चे समुपदेशक मुफीद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली गर्भपिशवीच्या तोंडाच्या कर्करोगाची तपासणी करून घेतली. परिसरातील महिलांमध्ये जनजागृती व समुपदेशन करून शिबिराच्या माध्यमातून चाचणी करून घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कर्वे समाज सेवा संस्थेच्या कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या समुपदेशिका वृषाली दिवाण व प्रयास चे समुपदेशक मुफीद बेग यांनी विशेष परिश्रम घेतले.