पुणे: येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्यावतीने दि ८ ते १४ एप्रिल हा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, प्रा चेतन दिवाण व रजिस्ट्रार विनायक कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा व मुख्य जयंती सोहळयानिमित्त मान्यवरांचे निरनिराळ्या विषयांवर मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
“ डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवीकरण” या विषयावर आयोजित वादविवाद स्पर्धेमध्ये कर्वे समाज सेवा संस्थेच्या समाजकार्याचे शिक्षण घेत असलेल्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या बहुतांशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त केले. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये “ फुले वारीअर्स” या गटाच्या मकबूल देशिंग, योगिता मंडल व मोहिनी साळुंखे यांनी प्रथम क्रमांक तर दलित पँथर्स या गटाच्या अजित मिसाळ, शिवराज सूर्यतळ व नम्रता पेंढारकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.परीक्षक म्हणून प्रा. चेतन दिवाण व प्रा. दादा दडस यांनी काम पाहिले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादनपर आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह सांगता समारंभामधील कार्यक्रमामध्ये संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, डॉ महेश ठाकूर, डॉ. चित्रलेखा राजुस्कर, सतीश खुडे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर अजिंक्य खारतोडे, सिमरन हटकर, शिवराज सुर्यतळ, दिपाली पवार, मकबूल देशिंग, राधा कांबळे, सोनाली देशमुख, शुभम ठाकरे, अभिजित काकडे या विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध क्षेत्रातील उपक्रम व योगदानाविषयी विस्तृत मांडणी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले तर आभार प्रवीण गुंजाळ यांनी मानले.