पुणे- पोटनिवडणूक घ्या आणि कोल्हापूरातील कुठल्याही मतदारसंघातून मला पराभूत करुन दाखवा, असे चॅलेंजच चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना दिलंय.’जे मला म्हणतात ना कोल्हापूरमधून पळून आले, ते तिथे निवडून आले नसते. मात्र मी आज मी एक चॅलेंज देतो की, कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलंय. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वर्षपूर्ती कार्यालय अहवालाचे प्रकाशन पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकांचे तिकीट जाहीर होण्यापूर्वीचा किस्साही यावेळी सांगितला. केवळ, तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शहांच्या आग्रहास्तव मी कोथरुडमधून निवडणूक लढविल्याचे पाटील यांनी सांगितले. अमितभाई म्हणाले, आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी. यावेळी, अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे मला कुठे यात अडकून ठेवता? मी जर मोकळा राहिलो तर महाराष्ट्रभर फिरेन. आपण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात आपल्या पक्षाच्या जास्त जागा निवडून आणू, असे मी त्यांना सांगितल्याचे पाटील म्हणाले. मात्र अमितभाईंनी आग्रह धरला तुला विधानसभा लढवायची असून पुण्यातील कोथरुड येथूनच असंही आवर्जून सांगितलं. त्यानंतर माझ्या नावाची या मतदार संघातून घोषणा झाली आणि मी निवडणूक लढवली जिंकली, असा किस्सा चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कार्यक्रमात सांगितला.
चंद्रकांत दादा म्हणाले की, ‘ निवडून आल्यानंतरचे जेवढे हे वर्ष लक्षात राहिले नाही, तेवढे निवडणुकीच्या काळातील एक महिना लक्षात राहिला आहे ! त्या संपूर्ण महिन्याभरात अनेकांनी मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला ! विरोधकांनी वारंवार आपल्यावर आरोप केले, छुप्या बैठका घेतल्या. परंतु, आई अंबाबाई आणि जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आलो ! आणि त्यांचा माझ्यावरील विश्वास असाच टिकावा या करीता मतदार संघात वर्षभर अनेक विकास कामे केली.’
यावेळी बोलताना चंद्रकांत दादा यांनी पुण्यामधील कमी होत असलेल्या कोरोना संसर्गाचे प्रमाण याचा ही उल्लेख केला. सार्वजनिक मंडळांनी फक्त सण-उत्सव साजरे न करता गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी तसेच सामाजिक उपक्रम राबवावेत, असे चंद्रकांत दादा यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, उप-महापौर सरस्वतीताई शेंडगे, आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार मुक्ताताई टिळक, आमदार सिद्धार्थ शितोळे, आमदार दिलीप कांबळे, आमदार भिमराव तपकीर, पुणे मनपा गटनेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, संघटक सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस राजेश यंपुरे, गणेश घोष, दिपक नागपुरे, दिपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, महिला अध्यक्षा अर्चना पाटील, ओबीसी अध्यक्ष योगेश पिंगळे, युवामोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष पुनीत जोशी, महाराष्ट्र प्रदेश युवा सरचिटणीस सुशिल मेंगडे, गणेश बीडकर, योगेश टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.