पुणे – गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा अकार्यक्षम, भ्रष्टाचारी, निकृष्ट व नियोजनशून्य कारभार सुरू आहे, असा आरोप भाजपने केला आहे. हा कारभार जनतेसमोर आणण्यासाठी शहरात ‘निष्क्रियतेची दहा वर्षे’ हे छायाचित्र आणि वर्तमानपत्रातील कात्रणांचे प्रदर्शन भाजपतर्फे आयोजित करण्यात आले आहे.
जंगली महाराज रस्त्यावरील भाजपच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाच्या आवारात आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन आज (रविवार) सकाळी ११ वा. कॉमन मॅनच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन मंगळवारपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
वाहतुकीची कोंडी, बसखरेदीत आलेले अपयश, बीआरटीची दुरावस्था, खड्डेयुक्त रस्ते, अनियमित व अपुरा पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनातील अपयश, डेंग्यू व स्वाईन फ्लू अशा साथरोगांनी घातलेले थैमान, मनपा रुग्णालयातील गैरसोयी, शिक्षण मंडळातील भ्रष्टाचार आदी विषयांचा शंभरहून अधिक छायाचित्रे व कात्रणांचा प्रदर्शनात समावेश आहे.