मुंबई. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणेच खान्देशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ‘मार्गदर्शक मंडल’मध्ये टाकण्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तयारी केली आहे. अर्थात अडवाणी यांच्याप्रमाणेच खडसे यांनीही सक्रिय राजकारणातून बाजूला व्हावे असेच संकेत पक्षश्रेष्ठींकडून विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने देण्यात आले आहेत. खडसेंना पक्षाने खूप काही दिले. आता त्यांनी पक्षाला मार्गदर्शक म्हणून सेवा द्यावी, अशी अपेक्षा केंद्राची असू शकते, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याचे सूतोवाच केले.
कट-कारस्थाने करून मला पक्षाबाहेर ढकलण्याचे प्रयत्न पक्षातील काही लोक जाणीवपूर्वक करीत आहेत, असा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावरून भाजपत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर तोफ डागली. त्यानंतर पाटील-खडसे कलगीतुरा रंगला
फडणवीस यांचे वडील, काकूही आमदार… ते कसे दिसले नाही?
पाटील यांना फडणवीस कसे दिसले नाहीत? त्यांचे वडील, काकू आणि ते स्वत: आमदार, मंत्री हाेते. मुळात चंद्रकांत पाटील हे पक्षात नवखे आहेत. भाजपबद्दल त्यांना शून्य माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाची भूमिका मांडली असेल. परंतु पक्षाने जे दिले ते उपकार नाहीत, मीदेखील पक्षासाठी खस्ता खाल्ल्या हे कसे विसरता ? असा सवालही खडेसंनी केला.