:फडणवीसांची पोस्ट,निषेधाचे सर्वांना आवाहन
आ.चंद्रकांत पाटलांनी व्हिडिओ जारी करत केला निषेध
भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somiya) यांच्या गाडीवर पुन्हा एकदा दगडफेक झाल्याची घटना मुंबईत घडली आहे, ही माहिती भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटवर मध्यरात्रीपूर्वी सुमारे 11.50 वाजता पोस्ट केली आहे.
रवी राणा आणि नवनीत राणा या दांपत्याला खार पोलिस स्टेशनला भेटून निघाले असताना किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली आणि त्यात फुटलेली काच लागून त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली.
फडणवीस यांनी फेसबुक आणि ट्विटर वर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये अवघ्या 22 सेकंदाचा व्हिडिओ टाकून त्यात निषेधाचे आवाहन करण्यात आले आहे.
सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार असे समजते की, हल्ल्या नंतर पहिली प्रतिक्रिया देताना सोमय्यांनी जोपर्यंत पोलीस आयुक्त संजय पांडे येथे येत नाही तोपर्यंत मी गाडीतून उतरणार नाही अशी भूमिका घेतलीय. या हल्ल्यानंतर सोमय्या वांद्रे पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलेत मात्र तिथे त्यांनी गाडीतून उतरण्यास नकार दिलाय.
“पोलीस आयुक्त इथे पोलीस स्थानकाच्या आवारात येत नाही तोपर्यंत मी गाडीमधून खाली उतरणार नाही,” अशी भूमिका सोमय्यांनी घेतलीय. “पोलीस स्थानकाच्या बाहेर असा भ्याड हल्ला केलाय. मला तरी झेड सिक्युरीटी आहे सामान्य भाजपा कार्यकर्त्याचं काय?” असा प्रश्न सोमय्यांनी विचारलाय. “आधी पोलीस आयुक्तांनी इथे येऊन त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं. हल्ला करणाऱ्यांवर खूनाचा गुन्हा दाखल करावा त्याशिवाय मी गाडीमधून खाली उतरणार नाही,” असं सोमय्या म्हणाले.
“संजय पांडे यांना लाज वाटत नाही संजय पांडे चपरासीसारखे वागताय. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये, पोलीस स्थानकाच्या आवारात ८० गुंड घुसतात आणि खून करण्याचा प्रयत्न करतात. पहिले त्या गुंडांवर खूनाचा गुन्हा दाखल करा. त्याशिवाय मी खाली उतरणार नाही,” असं सोमय्या म्हणाले.