पुणे : भारत गायन समाजाच्या वतीने पं. राम मराठे यांच्या स्मृतीप्रीतर्थ दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा संगीतभूषण पं. राम मराठे पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती समाजाच्या अध्यक्षा व ज्येष्ठ गायिका शैला दातार यांनी दिली आहे.
पुरस्काराचे हे २७ वे वर्ष असून महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सोमवार दि. २१ नोव्हेंबर, २०१६ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री ९.३० वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दोन लाख रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार वितरण समारंभांनंतर पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर व शैला दातार यांच्या गायनाचा कार्यक्रमही होणार आहे. सदर कार्यक्रम हा विनामूल्य असून तो सर्वांसाठी खुला असेल. कार्यक्रमासाठी प्रवेशिका अत्यावाश्यक असून त्या भारत गायन समाजाच्या शनिपार येथील कार्यालयात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सोमवार, दिनांक १४ नोव्हेंबर पासून उपलब्ध असतील. काही जागा निमंत्रितांसाठी व समाजाच्या सभासदांसाठी राखीव असतील.
कलेप्रती समर्पित असलेल्या कलाकाराचा योग्य गौरव व्हावा या उद्देशाने पं. राम मराठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी भारत गायन समाजाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. याआधी भालचंद्र पेंढारकर, यशवंतबुवा जोशी, जयमाला शिलेदार, पं. उल्हास कशाळकर, उस्ताद झाकीर हुसेन, पं. सुरेश तळवलकर आदी मान्यवर कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्कार वितरण समारंभांनंतर होणा-या पं. हृदयनाथ मंगेशकर व शैला दातार यांच्या गायनाच्या मैफलीला विशाल गंड्रतवार, चैतन्य कुंटे, डॉ. राजेंद्र दूरकर, समीर पुणतांबेकर आदी साथसंगत करतील.