मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 15 हजारांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आव्हाडांसह 12 जणांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तपासाला सहकार्य करण्याचे निर्दश ठाणे कोर्टाने दिला आहे. यानंतर आव्हाड तरुगांतून बाहेर आले आहेत.ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालामुळे जितेंद्र आव्हाडांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयीन कोठडी सुनावताच आव्हाडांनी तातडीने जामिनासाठी अर्ज केला. या जामीन अर्जावर आज दुपारी सुनावणी झाली. यावेळी त्यांच्यासह बारा जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अॅड. प्रशांत कदम यांनी युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान अॅड. कदम यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाडांची अटक बेकायदेशीर आहे. अटक करण्याच्या 72 तास आधी आव्हाडांना नोटीस देणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांनी तसे केले नाही. नियमांचे उल्लंघन करुन, कोणताही प्रोटोकॉल न पाळता आव्हाडांना अटक करण्यात आली आहे.
आव्हाडांच्या वकिलांनी सांगितले की, आव्हाड हे पोलिसांना चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहेत. ते स्वत: पोलिस स्टेशनमध्ये नोटीस घेण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यावर जामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नंतर अजामीनपात्र गुन्ह्याची कलमे लावण्यात आली. आव्हाडांनी चित्रपटगृहात कोणालाही मारहाण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात दाखल गुन्हे चुकीचे आहेत. तर, सरकारी वकिलांनी चौकशीसाठी आव्हाडांची 8 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली.
दरम्यान, न्यायालयात नातेवाईकांनी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. आव्हाड म्हणाले, मी पोलिस स्टेशनमध्ये असताना चाणक्याचा पोलिसांना वारंवार फोन येत होता. माझ्यावर कारवाईसाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे.
चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण करत ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना काल अटक केली होती. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिस आव्हाड यांना घेऊन ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले. न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात जमले होते. जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांविरोधात कलम 323 आणि कलम 504 लावण्यात आले आहे.
नेमके प्रकरण काय?
7 नोव्हेंबर रोजी रात्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्ते ठाण्यातील विवियन मॉल येथे घुसले. या वेळी त्यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच त्यांना विरोध करणाऱ्या काही जणांना बेदम मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. दुसऱ्या दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोफत शोचे आयोजन केले. त्यानंतर राजकीय स्तरावर हा वाद वाढतच गेला होता. हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या दृश्यांवर आहे आक्षेप
- छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंची लढाई दाखवली. त्यांचे नाते गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्राला माहीत आहे, मग विकृती दाखवली जात आहे? असे आक्षेप आव्हाडांनी नोंदवले.
- छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मांडीवर घेऊन कोथळा काढला.
- रामाला हनुमान तसा शिवाजी महाराजांना बाजीप्रभू असे चित्रपटात दाखवले.
फाशीवर दिले तरी माफी मागणार नाही
जितेंद्र आव्हाड म्हणाले, आमची इच्छा आहे की, महाराष्ट्रात विकृती जाऊ नये. बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांविरोधात लढले हे चित्रपटात दाखवले हे चूक आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचे काम सुरू असून विकृत इतिहास दाखवला जात आहे. मला फाशीवर दिले तरी माफी मागणार नाही.