पुणे -वाचन चळवळीच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर असून, त्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. वाचन चळवळीच्या वाढीसाठी ज्ञानाचे आदानप्रदान आवश्यक आहे. त्यामुळे बदल्यात काळानुसार आगामी काळात कोथरूड मध्ये दृकश्राव्य ग्रंथालय सुरु करण्याचा मानस पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.
चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून कोथरूड मतदारसंघासाठी सुरु केलेल्या मोफत फिरते पुस्तक घर उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाले. वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक-समिक्षक संजय जोशी, संजय कुलकर्णी, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, नगरसेविका वासंती जाधव, नगरसेवक जयंत भावे आदी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, वाचन चळवळीच्या विकासासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. राज्यातील सर्व ग्रंथालये ही माझ्याच अखत्यारीत येतात. त्यामुळे ग्रंथालये वाढीसाठी सरकारच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले. त्यात प्रामुख्याने ग्रंथालयांच्या अनुदान वाढीसह, गाव तिथे ग्रंथालय योजना राबविण्याचा निर्णय घेतला.
ते पुढे म्हणाले की, कोथरूड मध्ये वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी गेल्या वर्षी मोफत फिरते पुस्तक घर उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला कोथरुडकरांकडून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. आजच्या आधुनिक काळात तंत्रज्ञानाचाही मोठा विकास झाला आहे. त्यामुळे आगामी काळात तरुणांना या वाचन संस्कृतीचा भाग होता, यावा यासाठी कोथरूड मध्ये दृकश्राव्य ग्रंथालय (Audio-visual Library) सुरू करु, असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी प्रसिद्ध लेखन संजय जोशी यांनीही फिरते पुस्तक घर उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, वाचन संस्कृती लयाला चालल्याचं अनेकदा बातम्यांमधून वाचायला मिळतं.पण मूळात हे सर्व भ्रम आहेत. पण अनेकजण पुष्कळ वाचन करत आहेत. त्यामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनामध्ये फिरते पुस्तक घर हा उपक्रम अप्रतिम जोड आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी माननीय मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरूडमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सर्वां दिली. तसेच राज्यात वाचन संस्कृती वाढीसाठी माननीय दादांनी घेतलेल्या, निर्णयांमुळे आज राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रंथालय उभारण्यात येत असल्याचे नमुद केले. आशुतोष वैशंपायन यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अद्वैत जोशी यांनी केले.