मुंबई-सलमान खान गेल्या 4 वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर आहे. या टोळीने एवढ्या वर्षांत सलमानच्या हत्येचा 4 वेळा प्रयत्न केला होता. आता याप्रकरणी पंजाब पोलिसांनी गुरुवारी नवा खुलासा केला आहे. त्यानुसार लॉरेन्स टोळीने गेल्या तीन महिन्यांत सलमानवर हल्ला करण्याचे आणखी दोन प्रयत्न केले होते. या टोळीने सलमानला त्याच्या फार्म हाऊसच्या वाटेवर मारण्याचा कट रचला होता.पंजाब पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी शूटर कपिल पंडितला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान सलमानच्या हत्येचा खुलासा केला आणि संपूर्ण कटाची माहिती दिली.
पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायक सिद्धू मुसेवालाला मारण्यापूर्वी लॉरेन्सने सलमानच्या हत्येचा कट रचला होता. प्लॅन ए अयशस्वी झाल्यानंतर टोळीने प्लॅन बी तयार केला. मात्र, याबाबत फारशी माहिती मिळालेली नाही. या योजनेचे नेतृत्व गोल्डी ब्रार करत होता. गोल्डीने सलमानला मारण्यासाठी कपिल पंडित (लॉरेन्स गँगचा शार्प शूटर) ची निवड केली होती आणि पनवेल फार्महाऊसवर जाताना अभिनेत्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
शूटर्स दीड महिना फार्महाऊसजवळ राहिले, रेकीही केली होती
कपिल पंडित, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि बाकीचे शूटर्स पनवेल येथे भाड्याच्या खोलीत राहिले, कारण पनवेल येथे सलमानचे फार्म हाऊस आहे. येथे ते शूटर्स सुमारे दीड महिना राहिले. लॉरेन्स गँगच्या या सर्व शूटर्सनी सलमानवर हल्ला करण्यासाठी लहान शस्त्रे, पिस्तूल आणि काडतुसे खोलीत ठेवली होती.
वृत्तानुसार, हिट अँड रन प्रकरणानंतर सलमान खान वाहनाचा वेग कमी ठेवत असल्याचेही शूटर्सच्या लक्षात आले होते. सलमान जेव्हाही त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर येतो तेव्हा शेरा त्याच्यासोबत असतो.
लॉरेन्सने 2018 मध्ये पहिल्यांदा दिली होती धमकी
लॉरेन्सने 2018 मध्ये जोधपूर कोर्टातील सुनावणीदरम्यान सलमानला मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सलमान केवळ दोनदा जोधपूरच्या कोर्टात आला होता. दोन्ही वेळेस त्याची सुरक्षा कडेकोट ठेवण्यात आली होती. अलीकडेच सलमान खानच्या वकिलालाही धमकीचे पत्र आले होते. असेच पत्र त्याचे वडील सलीम खान यांनाही मिळाले होते. यानंतर हे पत्र लॉरेन्सनेच पाठवले असल्याची भीती व्यक्त केली जात होती.
सलमान खानला मारण्यासाठी लॉरेन्सने 4 वेळा प्लॅन केला होता. यासाठी त्याने एक रायफलही खरेदी केली होती. लॉरेन्सने 2018 मध्ये सलमानला मारण्यासाठी शूटर संपत नेहराला मुंबईत पाठवले होते. संपतकडे पिस्तूल होते. सलमान पिस्तुलच्या रेंजपासून खूप लांब होता. त्यामुळे त्याला मारता आले नाही. नंतर लांब पल्ल्याची रायफल 4 लाख रुपयांना विकत घेऊन संपतला देण्यात आली. सलमानला मारण्यापूर्वीच तो पकडला गेला. यानंतर लॉरेन्सने आणखी दोन प्रयत्न केले, पण सलमानला मारण्याची संधी मिळाली नाही.
काळवीट शिकार प्रकरणामुळे लॉरेन्स नाराज
लॉरेन्स सलमानवर काळवीट शिकार प्रकरणामुळे नाराज आहे. त्यामुळे त्याला मारण्याचा लॉरेन्सचा कट आहे. सलमान 24 वर्षांपासून काळवीट प्रकरणात कोर्टाच्या फेऱ्या मारत आहे. अलीकडेच लॉरेन्सने कबूल केले होते की, त्याचा समुदाय काळवीटांच्या शिकारीच्या विरोधात आहे. म्हणूनच सलमानला मारायचे आहे. यासाठी शूटरही पाठवण्यात आले होते.