रसिकांनी अनुभवली गुरु शिष्य परंपरेची ‘अनुकृती’
पुणे: गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, या कृतज्ञ भावनेने गुरू पं. रोहिणी भाटे यांच्या अनेक पिढ्यातील शिष्यांनी एकाच रंगमंचावर सादरीकरण करून त्यांना आदरांजली वाहिली. निमित्त होते उद्गार संस्थेच्या दशकपूर्तीनिमित्त झालेल्या अनुकृती मैफलीचे.
‘गणनाथ गौरी सुत’ या श्री गणेशाचे वर्णन करणाऱ्या धृपद रचनेने मैफलीची सुरुवात झाली. लीना पानसे, मुग्धा पाटणकर, अस्मिता चौगुले या उद्गारच्या शिष्यांनी याचे सादरीकरण केले. त्यानंतर गुरू रोहिणी भाटे यांचा साडे दहा मात्रातील ‘तालचित्ररूपक’ आसावरी पाटणकर यांनी सादर केला. अतिशय अवघड समजली जाणारी ही नृत्यरचना त्यांनी लीलया पेश करून रसिकांची मने जिंकली. तालाची सूक्ष्म जाण आणि अभिनयाची उंची यांचे विलक्षण दर्शन त्यांच्या या सादरीकरणातून रसिकांना घडले. त्यानंतर दिक्षा डान्स अकॅडमीच्या आभा वांबूरकर यांनी व त्यांच्या शिष्यांनी ‘ऋतू बरखा की आये या ‘चतरंग’ नृत्याविष्काराचे मनमोहक सादरीकरण केले. नर्तन प्रक्रियेतून परमार्थापर्यंत पोहोचण्याचा प्रवास उलगडणारी ‘कबीर’ रचनाही त्यांनी यावेळी प्रस्तुत केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रकृति नृत्यालयाच्या संचालिका व गुरू रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये यांच्या शिष्यांनी कृष्णाचे वर्णन करणारी ‘कवित’ नृत्यरचना ‘बघ बघ सखी तरी वाट रोखे माझा हरी’ सादर केली. वरकरणी चैत्र महिन्याचे वर्णन वाटले तरी प्रियकराच्या विरहाने व्याकूळ झालेली नायिका उलगडणारी ‘चैती’ ही अनोखी रचना त्यांनी सादर करून ताल, लय व अभिनय यावरील प्रभुत्वाचे दर्शन घडविले. त्यानंतर नऊ रांगांचे एकत्रित दर्शन घडविणारी ‘रागसागर’ ही रचना आसावरी पाटणकर यांच्या शिष्यांनी सादर केली.
सुकृती डान्स अकॅडमीच्या संचालिका मनीषा अभय व त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या प्रस्तुतीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मनीषा अभय यांनी सादर केलेल्या
एकल प्रस्तुतीस रसिकांनी विशेष दाद दिली.
‘तरंग’ नृत्याविष्काराने कार्यक्रमाची सुरमयी सांगता झाली. याचे सादरीकरण आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्या तसेच प्रकृती नृत्यालयाच्या शिष्यांनी केले. या कथक मैफलीस किशोर कोरडे, सारंग भंडारे (तबला), सुरश्री जोशी, (गायन), देवेंद्र देशपांडे, (हार्मोनियम), रोहित वनकर(बासरी) यांनी समर्पक साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले.