सतारवादक सहाना बॅनर्जी यांच्या कार्यशाळेचे आयोजन
पुणे : स्वरसुधातर्फे प्रसिद्ध सतारवादक सहाना बॅनर्जी यांच्या कार्यशाळेचे येत्या ७ मार्चला आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा विधी महाविद्यालय रस्त्यावरील श्री कृष्ण ध्यान मंदिर येथे संपन्न होणार आहे. दुपारी १ ते सायंकाळी ७ असा या वेळेत ही कार्यशाळा पार पडेल.
सहाना बॅनर्जी या रामपूर सेनिया घराण्याची परंपरा पुढे चालवितात. प्रसिद्ध सतार व सूरबहार वादक वडिल संतोष बॅनर्जी यांच्याकडून त्यांनी सतार वादनाचे धडे घेतले. तर आई छबी बॅनर्जी यांच्याकडून गायनाचे प्रशिक्षण घेतले.
सतार वादनातील प्रतिभावंत कलाकार म्हणून सहाना बॅनर्जी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही त्यांचा मोठा शिष्य व चाहता वर्ग आहे. पाश्चात्य शास्त्रीय संगीतातील दिग्गज कलाकारांच्या साथीने त्यांनी युरोपसह अन्य देशांतही मैफिली गाजवल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवरील संगीत नाटक अकादमी (उस्ताद बिस्मिल्ला खाँ) युवा पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले असून विविध कार्यशाळेच्या माध्यमातून सतार वादनाच्या प्रसार व प्रचाराचा ध्यास त्यांनी घेतला आहे.
ही कार्यशाळा सशुल्क असून सहभागी होण्यासाठी ९८८११०३३२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.