पुणे – रुग्णवाहिकांचे सायरन अकारण वाजविल्यास एक हजार रुपये दंडाची कारवाई करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
गर्दी नसतानाही तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाहतूक नसतानाही रुग्णवाहीकांचे चालक अकारण हॉर्न वाजवतात आणि सोबत सायरन सुरु ठेवतात. त्यामुळे सध्या साथीच्या काळात लोकांच्या मनात अकारण भिती निर्माण होऊन नैराश्य येते. त्याचा परिणाम वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. ही बाब आमदार शिरोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश काढले आहेत.
अकारण सायरन वाजविणाऱ्या रुग्णवाहिकेविरुद्ध ध्वनी प्रदुषण करीत असल्याने मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १९०(२) आणि कलम १९४एफ नुसार चालक वा मालक यांच्यावर प्रथम गुन्ह्यासाठी प्रत्येकी रुपये हजार आणि द्वितीय व त्यापुढील गुन्ह्यासाठी रुपये दोन हजार दंडाची कारवाई करण्यात यावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.