अभिजीत घोलप या मूळच्या पुणेकर तरुण संशोधकाचे यश कॅन्सर विरुद्धच्या लढाईत आता अचूक निदान प्रणालीचा सहभाग! ‘ऑप्ट्रा स्कॅन’ डिजीटल पॅथॉलॉजी सिस्टिममुळे निदान झाले सोपे
पुणे :
जागतिक स्तरावर कर्करोगाविरुद्धच्या लढाईत आता डिजीटल पॅथॉलॉजीमधील ‘ऑप्ट्रा स्कॅन’ प्रणाली हाताशी आली असून, त्यामुळे निदान सोपे आणि कमी वेळात होणार आहे.
मूळचे पुण्यातील असलेले अभिजीत घोलप यांच्या ‘ऑप्ट्रा ग्रुप’ कंपनीने ‘ऑप्ट्रा स्कॅन’ मशीन आणि निदानप्रणाली विकसित केली आहे. पुण्यातच या प्रणालीची निर्मिती होते. ‘ऑप्ट्रा ग्रुप’ कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. सध्या अमेरिकेत असलेल्या अभिजीत घोलप या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधक आणि उद्योजकाने या प्रणालीसाठी 17 पेटंट (बौद्धिक स्वामित्व हक्क) मिळवले आहेत. नेहमीच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये ‘ऑप्ट्रा स्कॅन’ हे उपकरण बसवले की त्याद्वारे रुग्णांच्या पेशींमध्ये कर्करोगाचा प्रादूर्भाव झाला आहे का? हे लगेच कळू शकणार आहे. त्यामुळे पारंपरिक सूक्ष्मदर्शकाने पेशींच्या स्लाईड पाहण्याच्या पद्धतीपेक्षा अधिक जलद निदान होऊ शकणार आहे.
‘टेली पॅथॉलॉजी’ प्रकारातील हे संशोधन आहे आणि रुग्णांसाठी ते वरदान ठरणार आहे. जेथे पॅथॉलॉजिस्ट उपलब्ध नाही, तेथेही ‘ऑप्ट्रा स्कॅन’ मशीनचा स्कॅनर उपयुक्त ठरणार आहे आणि कर्करोगाचे अचूक निदान करू इतरत्र तज्ज्ञाकडून शकणार आहे. स्लाईडवरील पेशी स्कॅन करून त्याच्या मोठ्या प्रतिमा (डिजीटल इमेज) तयार करण्याचे काम हे मशीन आणि त्यातील प्रणाली करते. पीडीएफ इमेज फाईल देखील तयार होते. पेशींची प्रतिमा 20 पट जास्त मोठी करून पाहता येते. पॅथॉलॉजी निदान पद्धतीतील सुक्ष्मदर्शकाची या संशोधनामुळे आवश्यकताच भासणार नाही. कर्करोगाचे निदान या प्रणालीमध्ये अचूक असणार आहे. शिवाय, ही निदान प्रणाली कमी खर्चिक परवडणार्या दरात उपलब्ध राहणार आहे.
‘ऑप्ट्रा स्कॅन’ निदान प्रणालीतील सॉफ्टवेअर कर्करोगाच्या पेशी, इतर पेशींपेक्षा वेगळ्या ओळखून दाखवते. ‘ऑप्ट्रा स्कॅन’ ने भारत सरकारकडून ही निदानप्रणाली ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सरकारच्या ‘बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्रीयल पार्टनरशीप’ प्रोग्रामअंतर्गत स्वस्त आरोग्यसेवा देण्याच्या कामात ‘ऑप्ट्रा स्कॅन’ योगदान देत आहे! प्रत्येक जिल्ह्यात ही प्रणाली उपलब्घ करण्यासाठी सरकार उत्सुक आहे.
स्कॅन झालेल्या पेशीबाबत ‘सेकंड ओपिनियन’ घ्यायचे असल्यास जगभरात क्षणात संपर्क साधणे आता डिजीटल निदानप्रणालीमुळे शक्य होणार आहे.
भारत, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेसारख्या विकसित होत असलेल्या देशात या तंत्राचा चांगला उपयोग होणार आहे. अमेरिकेतील ‘कॅन्सर मूनशूट 2020’ अभियानातील प्रणेते पॅट्रीक सून – शिआँग यांनीही या प्रणालीमध्ये रस दाखविला असून, अधिक संशोधन, विस्ताराला 35 कोटी मदत करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती अभिजीत घोलप यांनी या पत्रकात दिली आहे. ‘कॅन्सर मूनशूट 2020’ ही मोहीम अमेरिकन उपाध्यक्षांच्या पुढाकाराने सुरू आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनीही अभिजीत घोलप यांच्या तंत्र आणि संशोधनाचे कौतुक केले आहे. त्यांनीही पुण्यात या तंत्रज्ञान प्रणालीची पाहणी केलेली आहे. श्री. घोलप यांनी सांस्कृतिक क्षेत्रातही रूची असून, ‘देऊळ’ हा मराठी चित्रपट त्यांच्या ‘देविषा फिल्म्स’ची निर्मिती होती.