शहरात अत्याधुनिक मोबाईल टॉयलेटची संकल्पना अस्तित्वात आणा :आबा बागुल
पंचतारांकित स्वच्छतागृहे , मास्टर प्लॅन तयार
पुणे- जागेअभावी स्वच्छतागृहे उभारता येत नाही आणि उभारली तर त्याची स्वच्छता राखता येत नाही असा कारभार एकीकडे सुरु आहे तर दुसरीकडे स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराचा प्रवास सुरु असताना महिला वर्ग असो किंवा नागरिकांची स्वच्छतागृहांअभावी कुचंबणा होत आहे.ही परिस्थिती बदलण्यासाठी आता शहरात सर्वत्र अत्याधुनिक मोबाईल टॉयलेटची संकल्पना राबवावी अशी मागणी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, सध्यस्थितीत स्वच्छतागृहांच्या अभावामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः महिलावर्गाची मोठी कुचंबणा होत आहे. अनेक वर्षे हा प्रश्न सुटलेला नाही. जागेअभावी स्वच्छतागृहे उभारता येत नाही आणि उभारली तर त्याची स्वच्छता राखता येत नाही. त्यातही आधी बांधायचे नंतर कुणी हरकत घेतली तर तोडायचे असा कारभार स्वच्छतागृहांबाबत सुरु आहे. परिणामी हा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. नागरिकांना विशेषतः महिलावर्गाना दिलासा देण्यासाठी शहरात प्रत्येक शंभर अथवा दोनशे मीटर अंतरावर पालिकेने अत्याधुनिक मोबाईल टॉयलेट उभी करावीत. विशेष म्हणजे मोबाईल टॉयलेटचा एक मास्टर प्लॅन मी तयार करून घेतला आहे. हे मोबाईल टॉयलेट कोणत्याही आस्थापनेला बाधा न आणता ,कोणतीही दुर्गंधी नसलेली आणि स्वच्छतेबाबत पंचतारांकित आहेत हा मास्टर प्लॅन पालिका प्रशासनाला सुपूर्त करण्याची तयारीही आहे. जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल आणि खऱ्या अर्थाने स्वच्छ भारतचा प्रत्यय मिळेल. असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक आरोग्य धोक्यात न येता ही मोबाईल टॉयलेट संकल्पना प्रभावी ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करून आबा बागुल म्हणाले, सध्या जी स्वच्छतागृहे आहेत,त्याचा वापर नको ,अशी वेळ नागरिकांवर अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे येत आहे. अत्याधुनिक आणि पंचतारांकित असलेल्या मोबाईल टॉयलेटचा वापर सर्वसामान्य ते श्रीमंत वर्ग करतील अशी संकल्पना प्रत्यक्षात येणे सहजशक्य आहे. पालिकेने ही संकल्पना अंमलात आणली किंवा जरी बीओटीवर मोबाईल टॉयलेट उभारले तरी राज्य -केंद्र शासनाकडून पालिकेला अनुदान मिळवणे शक्य आहे. त्यामुळे या अत्याधुनिक मोबाईल टॉयलेटसाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न करून ते शहरात सर्वत्र उभारावेत त्यासाठी स्वयंसेवी संस्था, कंपन्या पुढाकार घेण्यासही तयार आहेत याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे.