मोफत डायपर सेवेद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य करा – आबा बागुल
पुणे
कुटुंबासाठी असो किंवा समाजासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या ;पण उतारवयात आजरपणामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेकडून त्यांचे बेडपान व्यवस्थित व्हावे यासाठी मोफत डायपर उपलब्ध करून त्यांचे जीवन सुसह्य करावे अशी मागणी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या पत्रात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, कुटुंबीय असो किंवा सार्वजनिक जीवनात दिशादर्शक ठरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची उतारवयात अवस्था खूपच बिकट होते. आजारपणामुळे अंथरुणाला खिळून पडलेल्या या वयोवृद्ध माता-पित्यांकडे आजच्या धकाधकीच्या आणि मॉडर्न जीवनात कुटुंबियांचेही दुर्लक्ष होते. परिणामी अंथरुणावर त्यांचे बेडपान व्यवस्थित होत नसल्याने किंबहुना घरच्या मंडळींकडून किळस म्हणून होणाऱ्या दुर्लक्षामुळे या वयोवृद्धांचे खूप हाल होतात. परिणामी त्याचा त्यांच्या आरोग्यावरच विपरीत परिणाम होतो.ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांना सेवा मिळतात मात्र बहुतांश वयोवृद्धांकडे त्याचीही व्यवस्था नसल्याने त्यांचे हाल होतात.नैसर्गिक विधी आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे या वयोवृद्धांचे जीवन असह्य होत आहे. त्यामुळे कुटुंबासाठी ,समाजासाठी योगदान देणाऱ्या या वयोवृद्ध माता-पित्यांचे हाल होऊ नये आणि आपली एक नैतिक जबाबदारी या हेतूने महापालिका हद्दीतील सर्व वयोवृद्ध माता -पित्यांसाठी महापालिकेच्यावतीने मोफत डायपर उपलब्ध करून दिल्यास खऱ्या अर्थाने या वयोवृद्धांचे अखेरचे जीवन सुसह्य होईल. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करून वयोवृद्ध नागरिकांसाठी महापालिकेने आधारवड ठरावे असे आबा बागुल यांनी नमूद केले आहे.