पुणे-पुणे शहरात पथारी, स्टॉलधारक, निवासी घरे, छोट्यामोठ्या व्यावसायिकांकडून मिळकत कर घेण्यात येवू नये अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केली आहे.
गोरगरिबांना यंदा वार्षिक मिळकत करामध्ये सूट द्या -आबा बागुल
ते म्हणाले,’को रोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने 21 दिवसांचा लॉकडाउन केंद्र सरकारकडून करण्यात आला असून नागरिकांनीही कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कंबर कसली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मोठे आर्थिक संकट समोर ठाकले असताना यातून सावरण्यास किती कालावधी लागेल सांगता येणार नाही. आरबीआय ने तीन महिन्याचे हप्त्यामध्ये मुदतवाढ दिली आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेपो रेट देखील कमी करून हप्ते कमी करण्यात आले आहेत.शासन स्तरावर अर्थव्यवस्था बळकटीसाठी उपाय योजना करण्यात येत असून नक्कीच भारत या संकटातून सावरून महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल असा विश्वास आहे.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कष्टकरी वर्ग असून गेल्या ११ दिवसापासून त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे एक वेळचे जेवण मिळणे मुश्किल झाले आहे. पुणे शहरात पथारी, स्टॉलधारक, निवासी घरे, छोट्यामोठ्या व्यावसायिकांकडून मिळकत कर घेण्यात येतो. यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळीकडेच बंद असल्याने या सर्वांवर आर्थिक संकट ओढवले असून पथारी कामगार व स्टॉल धारकांना १ वर्षाचा, निवासी घरांना ३ महिन्याचा व छोटीमोठ्या व्यावसायिकांना १ महिन्याचा सन २०२०-२१ च्या वार्षिक मिळकत करामध्ये सूट देऊन नागरिकांना दिलासा दयावा याकरिता स्थायी समिती व मुख्यसभा मान्यता देईल हे गृहीत धरून नागरिकांना मिळकत करातून सूट द्यावी