‘चोरी ते चोरी, पुन्हा शिरजोरी’; असे वर्तन स्वाभिमानी महाराष्ट्राला रुचणारे नाही, काँग्रेसची घणाघाती टीका
पुणे : ‘परिसीमन विधेयक मंजूर होण्यापासून कोणाचा बाप रोखू शकत नाही,’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारची अरेरावीची आणि गावगुंडाची भाषा वापरणे सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नसल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, संतपरंपरा, शाहू-फुले-आंबेडकर, टिळक, गोखले आणि आगरकर यांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार, मनोहर जोशी ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविले. मात्र, अशा प्रकारची दर्पोक्तीपूर्ण भाषा यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला मिळाली नसल्याचे तिवारी म्हणाले.
पक्षफोडीतून मिळविलेल्या संख्याबळाचा अहंकार कशासाठी?
केंद्रातील सत्तेच्या बळावर राजकीय पक्षांमध्ये फूट पाडून मिळविलेल्या संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री फडणवीस अहंकारी भाषा वापरत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपविरोधात महाविकास आघाडीला ४८ पैकी ३१ खासदार निवडून दिले होते, असे सांगत प्रलोभने आणि दबावतंत्राच्या माध्यमातून खासदारांना महायुतीच्या गोटात आणल्याचा आरोपही त्यांनी केला.
अशा खासदारांच्या संख्याबळावर ‘कोणाचा बाप रोखू शकत नाही’, अशी भाषा करणे स्वाभिमानी महाराष्ट्राला रुचणारे नाही, असे तिवारी यांनी ठणकावले.
खासदारांनी सदसद्विवेकबुद्धीने मतदान करावे
महायुतीच्या गोटात गेलेल्या खासदारांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या कौलाचे स्मरण ठेवावे. परिसीमन विधेयकावर सदसद्विवेकबुद्धीने मतदान केल्यास मुख्यमंत्र्यांचा संख्याबळाचा दावा फोल ठरेल, असे तिवारी म्हणाले.
परिसीमन विधेयकाला गृहीत धरलेला खासदारांचा पाठिंबा हा मूळ जनादेशाच्या आणि नैतिक बळाच्या आधारावर मिळालेला नसल्याचे फडणवीस यांनी विसरू नये, असेही त्यांनी म्हटले.
लोकशाहीचे अन्य स्तंभ अद्याप शिल्लक आहेत!
सत्तेच्या विरोधात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर राजकीय वर्चस्व निर्माण केल्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडून अशी भाषा वापरली जात असल्याचा आरोप तिवारी यांनी केला.
लोकशाहीतील प्रशासन आणि न्यायव्यवस्था हे अन्य स्तंभ अद्याप पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या अधीन झालेले नाहीत, याचेही मुख्यमंत्र्यांनी स्मरण ठेवावे, असे त्यांनी सुनावले.
‘चोरी ते चोरी, पुन्हा शिरजोरी’ अशा स्वरूपाचे वर्तन स्वाभिमानी महाराष्ट्राला रुचणारे नाही. सत्तेचा उन्माद आणि संख्याबळाचा अहंकार बाळगण्यापेक्षा संविधान आणि लोकशाही मूल्यांचा आदर करावा, असे गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.

