सुनील महाजन यांची अध्यक्षपदी निवड; शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा; सभा तहकूब झाल्याने ठराव अवैध असल्याचा सोमण यांचा दावा
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतील (मसाप) अंतर्गत वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव २० विरुद्ध शून्य मतांनी मंजूर करण्यात आल्याचे सुनील महाजन गटाने जाहीर केले आहे. मात्र, अविश्वास ठरावावर मतदान होण्यापूर्वीच सभा तहकूब करण्यात आल्याने ठराव मंजूर झालेलाच नाही, असा दावा योगेश सोमण यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेतील नेतृत्वाचा वाद आणखी चिघळला आहे.
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जवळ आले असताना घडलेल्या या घटनांमुळे साहित्यविश्वात खळबळ उडाली आहे.
सुनील महाजन गटाकडून नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा
अविश्वास ठराव मंजूर केल्याचे जाहीर करत महाजन गटाने नव्या पदाधिकाऱ्यांची निवडही घोषित केली आहे.
- अध्यक्ष – सुनील महाजन
- प्रमुख कार्यवाह – राजन लाखे
- कोषाध्यक्ष – उन्मेश गायधनी
याशिवाय शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्याचेही या गटाने जाहीर केले आहे.
सभा तहकूब केली; अविश्वास ठराव मंजूर झालाच नाही – योगेश सोमण
दरम्यान, योगेश सोमण यांनी महाजन गटाचा दावा फेटाळून लावला आहे.
सुनील महाजन हे बैठकीत आरडाओरड करत होते. अविश्वास ठरावाला उत्तर द्या, असे म्हणत गोंधळ घालत होते. प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक यांनी इतिवृत्त वाचून दाखविले. कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनीही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळ सुरूच राहिल्याने अध्यक्ष या नात्याने आपण सभा तहकूब केली. त्यामुळे आमच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झालेलाच नाही, असे सोमण यांनी स्पष्ट केले.
साहित्य परिषदेच्या दारात राजकीय संघर्ष; मोठा पोलिस बंदोबस्त
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयाबाहेर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भाजप आणि शिवसेनेतील कथित शीतयुद्धाचे पडसाद आता साहित्य परिषदेच्या कारभारातही उमटत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दोन कोटींच्या शासकीय निधीच्या हिशोबावरून वाद
मंत्री उदय सामंत यांच्या खात्यामार्फत देण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीचा हिशोब सादर करावा, अशी मागणी सुनील महाजन गटाकडून करण्यात येत आहे. संबंधित शासकीय विभागाकडूनही दोन वेळा निधीचा हिशोब मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे, शंभराव्या साहित्य संमेलनाचे आयोजक असलेल्या समर्थ युवा फाउंडेशनशी संबंधित भाजपचे राजेश पांडे यांनी या संमेलनासाठी शासनाची आर्थिक मदत नको, अशी भूमिका घेतली आहे.
शंभराव्या साहित्य संमेलनापूर्वी साहित्य परिषदेत नेतृत्वाचा पेच
मराठी साहित्यविश्वाच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्व असलेले शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जवळ आले असताना महाराष्ट्र साहित्य परिषदेत दोन गट आमनेसामने आले आहेत.
एका गटाने अविश्वास ठराव मंजूर करून नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे, तर दुसऱ्या गटाने संपूर्ण प्रक्रिया अमान्य केली आहे. त्यामुळे अविश्वास ठरावाची वैधता, परिषदेचे अधिकृत नेतृत्व आणि शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा निर्णय याबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे.

