डीपी रोडवरील सर्वाधिक २ लाख ३९ हजार चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली; रविवार पेठेत सायंकाळीही कारवाई सुरूच
पुणे : पुणे महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेचा जोर शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) कायम राहिला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील विविध भागांत एकूण ३ लाख ५७ हजार २८० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
यामध्ये म्हात्रे पूल ते राजाराम पूल यादरम्यान डीपी रोडवरील नदीकिनाऱ्याच्या परिसरात सर्वाधिक मोठी कारवाई झाली. कोंढवा, सूस-नांदे रस्ता, घोरपडी, मुंढवा आणि शुक्रवार पेठ परिसरातही महापालिकेने अतिक्रमण निष्कासनाची मोहीम राबविली.
परिमंडळनिहाय कारवाईचा तपशील :
- परिमंडळ क्रमांक १ : आज कारवाई नाही.
- परिमंडळ क्रमांक २ : कोंढवा बुद्रुक, सोमजी चौक आणि आंबेडकरनगर परिसर – ३७,३०० चौरस फूट.
- परिमंडळ क्रमांक ३ : सूस-नांदे मुख्य रस्ता – ४१,५०० चौरस फूट.
- परिमंडळ क्रमांक ४ : बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी आणि मुंढवा चौक परिसर – ३५,५०० चौरस फूट.
- परिमंडळ क्रमांक ५ : शुक्रवार पेठेतील बाजीराव रस्ता, केळकर रस्ता – ३,५०० चौरस फूट. रविवार पेठेत कारवाई अद्याप सुरू.
- परिमंडळ क्रमांक ६ : म्हात्रे पूल ते राजाराम पूल, डीपी रोड परिसर – २,३९,४८० चौरस फूट.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण अतिक्रमणमुक्त क्षेत्र : ३,५७,२८० चौरस फूट.
डीपी रोडवरील कारवाई ठरली सर्वांत मोठी
मुठा नदीकिनाऱ्यावरील बड्या लॉन्स आणि हॉटेल व्यावसायिकांच्या अतिक्रमणांविरोधात आज मोठी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये व्यावसायिकांनी स्वतःहून १,०६,९५० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली, तर महापालिकेने प्रत्यक्ष १,३२,५३० चौरस फूट क्षेत्रावर निष्कासनाची कारवाई केली.
दरम्यान, रविवार पेठेतील अतिक्रमण निष्कासनाची मोहीम सायंकाळीही सुरू असल्याने आजच्या एकूण कारवाईचे क्षेत्रफळ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

