इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय व्हायला हवा होता; राष्ट्रवादीच्या भूमिकेवर काँग्रेसकडून तीव्र नाराजी
मुंबई : डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा देण्याचे निश्चित केल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीने असा निर्णय घेतला असेल, तर तो दुर्दैवी असून मोदी सरकारला मदत करणारा आहे, अशी टीका सावंत यांनी केली.
डिलिमिटेशनसारख्या महत्त्वपूर्ण विषयावर इंडिया आघाडीच्या बैठकीत एकत्रित चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोदी सरकारच्या षड्यंत्राला राष्ट्रवादी बळी पडली : सावंत
संसदेच्या मागील अधिवेशनात मोदी सरकारचे विधेयक पडले, त्यावेळी इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र होते. सरकारचा पराभव झाल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. हे मोदी सरकारचे षड्यंत्र असून राष्ट्रवादी काँग्रेस त्याला बळी पडल्याची चिंता वाटते, असा आरोप सचिन सावंत यांनी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही समाजमाध्यमातून या विषयावर भूमिका मांडली असून, छोट्या राजकीय पक्षांवर दबाव आणला जात असल्याचे म्हटले आहे, असा संदर्भ सावंत यांनी दिला.
पवार साहेब निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील, असे वाटले होते!
शरद पवार यांनी अनेक वर्षे धर्मनिरपेक्ष विचारांचे राजकारण केले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी पवार साहेब शंभर वेळा विचार करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, असा निर्णय झाला असेल, तर ते दुर्दैवी असल्याचे सावंत यांनी म्हटले.
या भूमिकेमुळे हुकूमशाही मानसिकतेच्या मोदी सरकारला मदत होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पुण्यात सतेज पाटलांचा विरोध; आता सचिन सावंत यांच्याकडूनही नाराजी
विशेष म्हणजे, शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनीही डिलिमिटेशन विधेयकाला विरोध दर्शविला होता.
डिलिमिटेशनचे ‘गाजर’ स्वीकारणे म्हणजे देशातील लहान राजकीय पक्षांनी स्वतःचाच खड्डा खणून घेण्यासारखे असल्याची टिप्पणी त्यांनी केली होती. त्याचवेळी शरद पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडीसोबत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर आता काँग्रेसकडून उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे.
सुप्रिया सुळे यांच्या अंतिम भूमिकेकडे लक्ष
डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, प्रस्तावित विधेयकासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अंतिम अधिकृत भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष या मुद्द्यावर एकत्रित भूमिका घेणार की स्वतंत्र भूमिका मांडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

