केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
मॉडर्न महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त विशेष समारंभ; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
पुणे (प्रतिनिधी) भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाच्या आचरणात उतरली पाहिजेत. सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी संविधानाचा सखोल अभ्यास, नागरिकांना आपल्या कर्तव्यांची जाणीव आणि लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा आवश्यक आहे. हाच खऱ्या अर्थाने संविधान दिनाचा संकल्प असला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात (स्वायत्त) आयोजित संविधान दिन विशेष समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सहसचिव प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे होत्या. यावेळी संस्थेचे सचिव प्रा. शामकांत देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या व नगरसेविका प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्याणी जोशी आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘‘भारत हा तरुणांचा देश आहे. त्यामुळे तरुण पिढीला भारतीय संविधानाची सखोल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. संविधानाने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय आणि समान संधी देणारी मूल्याधिष्ठित व्यवस्था निर्माण केली आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवली पाहिजे. संविधान केवळ वाचणे पुरेसे नाही, तर त्यातील तरतुदी समजून घेऊन संविधानिक मूल्यांचा अंगीकार करणे गरजेचे आहे.’’
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना मोहोळ यांनी त्यांच्या जीवनाशी निगडित ‘पंचतीर्थां’च्या विकासाचा उल्लेख केला. मध्य प्रदेशातील महू येथील जन्मभूमी, लंडनमधील शिक्षणभूमी, नागपूर येथील दीक्षाभूमी, नवी दिल्लीतील महापरिनिर्वाणभूमी आणि मुंबईतील चैत्यभूमी या स्थळांच्या विकासासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळांच्या विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधाननिर्मितीच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीला भक्कम पाया दिला असून, त्यांच्या विचारांचे स्मरण केवळ शब्दांतून नव्हे, तर कृतीतून झाले पाहिजे, असेही मोहोळ म्हणाले.
प्रास्ताविकात प्राचार्या प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी संविधान दिनाचे महत्त्व विशद केले. संविधान हा केवळ कायद्यांचा ग्रंथ नसून भारतीय लोकशाहीचा आत्मा आणि प्रत्येक नागरिकाच्या अधिकार व कर्तव्यांचा आधार आहे. संविधानातील मूल्ये दैनंदिन जीवनात रुजविणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, तरुण पिढीने जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने झाली. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि भारतीय संविधानास पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा शिंदे हिने संविधानिक मूल्यांविषयी आपले विचार मांडले. यावेळी संविधानाच्या महत्त्वावर आधारित विचारप्रवर्तक लघुपटाचेही सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैजयंतीमाला जाधव यांनी केले, तर डॉ. शांतश्री सेनगुप्ता यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

