३३ प्रकारचे ४६ सुवर्णालंकार, २३८.२ कॅरेटचे हिरे; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक दान
तिरुपती : देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तिरुमला येथे भगवान श्री वेंकटेश्वरांच्या चरणी चेन्नईतील वर्धमान जैन आणि राधिका जैन या दाम्पत्याने तब्बल १२१ किलो सोन्याचे दान केले आहे. या दानाची निर्मिती खर्चासह एकूण किंमत २०७ कोटी ६० लाख रुपये असल्याची माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानच्या इंग्रजी प्रसिद्धिपत्रकात देण्यात आली आहे.
गुरुवारी (२६ नोव्हेंबर २०२६) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत हे दान अर्पण करण्यात आले.
सुवर्ण मुकुटासह ४६ मौल्यवान अलंकार
दानामध्ये सुवर्ण मुकुट, विविध प्रकारचे हार, कंकणे, कर्णभूषणे, शंख आणि चक्रासाठी सुवर्ण कवच यांसह अनेक मौल्यवान अलंकारांचा समावेश आहे.
महादानाची वैशिष्ट्ये
- एकूण सोने : १२१ किलो (२४ कॅरेट)
- सुवर्णालंकार : ४६
- अलंकारांचे प्रकार : ३३
- हिरे : २३८.२ कॅरेट
- एकूण मूल्य : सुमारे २०८ कोटी रुपये
पद्मावती देवीसाठीही १५ किलो सोने
१२१ किलो सोन्यापैकी १०६ किलो सोन्याचा वापर तिरुमला येथील भगवान श्री वेंकटेश्वरांच्या अलंकारांसाठी करण्यात आला आहे. उर्वरित १५ किलो सोन्याचा वापर तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवीसाठी सुवर्ण वस्त्र तयार करण्याकरिता केला जाणार आहे.
मुख्यमंत्री नायडूंकडून दाम्पत्याचे कौतुक
भगवान वेंकटेश्वरांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जैन दाम्पत्य आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत मंदिरातील रंगनायकुल मंडपात सुवर्णालंकारांची पाहणी केली. दाम्पत्याच्या उदारतेचे त्यांनी कौतुक केले.
त्यानंतर जैन कुटुंबीयांनी पारंपरिक धार्मिक विधीनुसार मंदिरात सुवर्णालंकार अर्पण केले.
तिरुमला तिरुपती देवस्थानच्या इतिहासातील हे एक ऐतिहासिक दान असल्याचे देवस्थान प्रशासनाने म्हटले आहे.
छायाचित्र व माहिती सौजन्य : तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD).TTD News

