पुण्याला कोयता नगरी करायची आहे का? गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा – हर्षवर्धन सपकाळ

Date:

मोदी-शाह सरकारकडून संविधान मोडीत काढण्याचे काम सुरू असल्याचा काँग्रेसचा आरोप; ठाण्यात भव्य संविधान बचाव रॅली

मुंबई : पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर भरदिवसा झालेल्या जीवघेण्या हल्ल्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. पुण्याला कोयता नगरी करायची आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित करत गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी ठरले असून, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसच्या वतीने ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य संविधान बचाव रॅलीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

गुन्हेगार मोकाट; राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे

पुण्यात न्यायालय परिसरात एका व्यक्तीवर गंभीर हल्ला होणे ही राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना आहे. गुन्हेगार मोकाट सुटले असून, त्यांना कायद्याचे भय राहिलेले नाही, अशी टीका सपकाळ यांनी केली.

राज्याला पूर्णवेळ आणि सक्षम गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

संविधान वाचले तर देश वाचेल – डॉ. सिरिवेल्ला प्रसाद

भारतीय संविधानाने सर्व जाती-धर्मांना, महिलांना आणि वंचित घटकांना समान हक्क व अधिकार दिले. व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. मात्र, केंद्रातील मोदी-शाह सरकार सर्वसामान्य जनतेचे हे अधिकार हिरावून घेण्याचे काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी केला.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान धोक्यात आले असून, ते वाचविणे ही काळाची गरज आहे. संविधान वाचले तरच देश वाचेल, असे त्यांनी सांगितले.

भाजपाचे संविधानप्रेम म्हणजे ‘पुतना मावशीचे प्रेम’ – सपकाळ

‘मनुस्मृती’ आणि ‘बंच ऑफ थॉट्स’ला महत्त्व देणाऱ्या भाजपाला आज संविधानाचा पुळका आला आहे. हे संविधानप्रेम म्हणजे ‘पुतना मावशीचे प्रेम’ असल्याची बोचरी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

संविधान निर्मितीच्या काळातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान रद्द करून मनुस्मृती आणायची असल्याचा आरोप त्यांनी केला.

गेल्या अनेक वर्षांपासून संविधानाची पायमल्ली करणारा भाजप स्वतःच संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी मोर्चे काढत असल्याचे चित्र हास्यास्पद आहे, असेही सपकाळ म्हणाले.

ठाण्यातूनच लोकशाहीच्या रक्षणाचा संदेश – सतेज पाटील

तीन-चार वर्षांपूर्वी ठाण्यातूनच लोकशाहीची हत्या झाली, असा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केला.

त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी ठाण्यातून ही रॅली काढण्यात आली आहे. मतांची चोरी होत असल्याचा आरोप करत त्यांनी गोकुळमधील सत्ताबदलाचाही संदर्भ दिला.

महाराष्ट्रात शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवायचा असेल, तर संविधानाचे रक्षण करावे लागेल, असे पाटील म्हणाले.

संविधानातील समता आणि बंधुतेच्या विचारांवर घाला – बाळासाहेब थोरात

भारतीय संविधानामध्ये संतांचे विचार, समता आणि बंधुतेची मूल्ये आहेत. मात्र, भाजप सरकार याच विचारांवर घाला घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.

मोठ्या संघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य आणि संविधान मिळाले. आज त्याच संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. मतांची चोरी आणि सरकारे चोरण्याचे प्रकार थांबले पाहिजेत, असे थोरात म्हणाले.

सर्वसामान्यांच्या अधिकारांवर गदा – नसीम खान

भाजप सरकारकडून लोकशाही आणि संविधानाची पायमल्ली होत असल्याचा आरोप माजी मंत्री नसीम खान यांनी केला.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधानाच्या रक्षणासाठी संघर्ष करत आहेत. संविधानाने सर्व जाती, धर्म, भाषा आणि पंथांच्या नागरिकांना दिलेल्या समान अधिकारांवर गदा आणली जात असल्याचे खान म्हणाले.

संविधान रक्षणाची सामूहिक शपथ

महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान बचाव रॅलीला सुरुवात करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थितांना संविधान रक्षणाची शपथ दिली.

या रॅलीत डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, शोभा बच्छाव, प्रणिती शिंदे, रवींद्र चव्हाण, शिवाजी काळगे, आमदार भाई जगताप, माजी खासदार कुमार केतकर, हुसेन दलवाई, डॉ. विश्वजीत कदम, रमेश बागवे, सुनिता गावंडे, मुजफ्फर हुसेन, चरणसिंग सप्रा, मोहन जोशी, ॲड. गणेश पाटील, ॲड. संदेश कोंडविलकर यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आरोपांवर भाजप आणि राज्य सरकारची प्रतिक्रिया उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात सुरक्षित पदपथ, दर्जेदार रस्ते अन् शाश्वत वाहतुकीसाठी विचारमंथन; ‘अर्बन स्ट्रीट्स समिट २०२६’ संपन्न

‘कम्प्लीट स्ट्रीट्स’ संकल्पनेनुसार शहरव्यापी नियोजनावर भर; महापौर मंजुषा नागपुरे,...

पुण्यात पोलिसांचे रात्री तीन तासांत ७२ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन!

कारागृहातून सुटलेल्या ७१४ आरोपींची पडताळणी; चार अवैध शस्त्रे जप्त,...

पुणे पोलिसांची अंमली पदार्थ तस्करांवर मोठी कारवाई; २५० किलो गांजासह दोघांना अटक!

लोणी काळभोर ते शिरूरपर्यंत संशयित वाहनाचा पाठलाग; दीड कोटींहून...