नुकसानग्रस्त व्यापारी व नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे महापौरांचे आश्वासन
पुणे | मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६
महात्मा फुले पेठेतील विजय वल्लभ शाळा व अंगारशाह तकिया परिसरातील टिंबर मार्केटमध्ये मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पहाटे घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, बचावकार्य तसेच झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली.
या आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अनेक दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभे केलेले व्यवसाय आगीत जळून खाक झाल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्यावर कठीण परिस्थिती ओढवली आहे.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर महापौर मंजुषा नागपुरे यांनी नुकसानग्रस्त व्यापारी व नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. या संकटाच्या काळात पुणे महानगरपालिका प्रशासन बाधित नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत व सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अनेक वर्षांच्या कष्टातून उभे राहिलेले व्यवसाय एका आगीत उद्ध्वस्त होणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या व्यापारी बांधवांना आणि नागरिकांना या संकटातून सावरण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न केले जातील. या कठीण काळात आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी तसेच बाधितांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, यावर महापौरांनी विशेष भर दिला.

