१९ व्या महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी डॉ. इंद्रजीत भालेराव!

Date:

स्वागताध्यक्षपदी दत्ताशेठ झुरंगे यांची निवड; २७ नोव्हेंबरला सासवडमध्ये साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

सासवड, दि. १५ नोव्हेंबर २०२६ (माय मराठी वृत्तसेवा) :

अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ग्रामीण कवी डॉ. इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पुरंदर तालुका काँग्रेसचे नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ताशेठ झुरंगे यांची निवड झाली आहे.

संमेलनाचे मुख्य संयोजक आणि ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी ही माहिती दिली.

शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या निमंत्रकपदी जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त सुनील असवलीकर यांची निवड करण्यात आली आहे.

महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर

महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव असलेल्या खानवडी येथे, कऱ्हा नदीच्या परिसरात दरवर्षी या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदा मात्र हे संमेलन सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात होणार आहे.

महात्मा फुले यांच्या सामाजिक प्रबोधनाच्या विचारांचा प्रसार करणे, ग्रामीण साहित्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि साहित्यिकांना एकत्र आणणे, हा या संमेलनामागील उद्देश आहे.

यंदाच्या संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, कथाकथन, नाट्यप्रयोग आणि कविसंमेलन अशा विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शेती-मातीचा आवाज बुलंद करणारे कवी इंद्रजीत भालेराव

संमेलनाध्यक्ष डॉ. इंद्रजीत भालेराव हे मराठी ग्रामीण साहित्यविश्वातील महत्त्वाचे कवी म्हणून परिचित आहेत.

शेतकरी, ग्रामीण जीवन, शेतीतील संघर्ष, मातीशी असलेले माणसाचे नाते आणि बदलत्या गावजीवनाचे वास्तव त्यांनी आपल्या कवितांमधून प्रभावीपणे मांडले आहे.

त्यांचे ‘पीकपाणी’, ‘आम्ही काबाडाचे धनी’, ‘दूर राहिला गाव’, ‘कुळंबिणीची कहाणी’, ‘पेरा’, ‘टाहो’, ‘गावाकडची माती’, ‘भूमीचे मार्दव’ आणि ‘उलगुलान’ हे काव्यसंग्रह, तसेच ‘बाप’ ही दीर्घकविता विशेष गाजली आहे.

कवितेबरोबरच त्यांनी ललित आणि समीक्षात्मक लेखनही केले आहे. ‘मातीशी नाते’, ‘शेती आणि साहित्य’, ‘गावकळा’, ‘नांगराचा फाळ’, ‘मराठी ग्रामीण कविता : स्वरूप आणि चिकित्सा’ या पुस्तकांमधून त्यांनी ग्रामीण साहित्याचे विविध पैलू उलगडले आहेत. ‘समकालीन ग्रामीण कविता’ या पुस्तकाचे संपादनही त्यांनी केले आहे.

शेती, शेतकरी आणि ग्रामीण समाजाच्या प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडणाऱ्या डॉ. भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली यंदाचे संमेलन होणार असल्याने साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

स्वागताध्यक्ष दत्ताशेठ झुरंगे यांचे सामाजिक कार्य

संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झालेले दत्ताशेठ झुरंगे हे गेल्या दोन दशकांपासून पुरंदर तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. शिवशंभो पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वारकऱ्यांसाठी अन्नदान आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.

या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

नियोजन बैठकीला मान्यवरांची उपस्थिती

संमेलनाच्या नियोजन बैठकीला मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ जगताप, साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष श्यामकुमार मेमाणे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धीवार, भीमथडी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, सचिव दीपक पवार, खानवडीचे माजी सरपंच रवींद्र फुले, रमेश बोरावके, दत्ता होले, संभाजी महामुनी, गंगाराम जाधव, दत्ता कड, अरविंद जगताप आणि प्रवीण कदम आदी उपस्थित होते.

महात्मा फुले यांच्या सामाजिक समतेच्या आणि शिक्षणविषयक विचारांना साहित्याच्या माध्यमातून उजाळा देणाऱ्या या संमेलनात साहित्यिक, कवी, अभ्यासक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

माय मराठी — महाराष्ट्राचा आवाज जगभर

www.mymarathi.net

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुरलीधर मोहोळ यांच्या एकता दौडीसाठी पुणेकरांचे ५० लाख देण्याचा अधिकार कोणी दिला – धंगेकर संतापले आयुक्त नवल किशोर राम यांच्यावर

दुष्काळाच्या नावाखाली काटकसर, मग संस्कृती प्रतिष्ठानच्या मॅरेथॉनसाठी ५० लाखांची...

कॉकरोच जनता पार्टीची महाराष्ट्र राज्य समन्वय समिती जाहीर; १५ सदस्यांवर संघटनात्मक विस्ताराची जबाबदारी!

पश्चिम झोनच्या प्रभारीपदी क्षितिज पगार यांची नियुक्ती; बेरोजगारी, शिक्षण...