आदिवासी लोकजीवन

Date:

भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त विशेष लेख

भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्यानिमित्ताने भारत सरकारने २०२१ मध्ये १५ नॉव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून घोषीत केला. हा दिवस बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनानिमित्त आदिवासी स्वातंत्रसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपण आदिवासी लोकजीवनावर प्रकाश टाकुया!

आर्य लोक दंडकारण्य ओलांडून दक्षिणेकडे येण्यापूर्वी या भागात भिल्ल, निषाद, किरात, कोल आणि शबर या वंशाचे लोक राहत होते. रामायण महाभारताच्या काळापासून जुन्या वाङमयात त्यांचे वर्णन आढळते. आर्यांचे हिंदुस्थानात आगमन होण्यापूर्वी आदिवासी हेच या देशाचे मूळ रहिवासी होते. त्या काळी आदिवासी टोळ्याटोळ्यांनी राहात होते. इकडे आल्यावर आर्यांनी इथली भूमी काबीज केली. तेव्हा आदिवासींच्या टोळ्यांपैकी पुष्कळ टोळ्यांनी आर्य लोकांशी जुळवून घेतले. काही टोळ्या लढल्या, झगडल्या. पराभूत झाल्या. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकविण्यासाठी पर्वतमय प्रदेशातल्या दऱ्याखोऱ्यांत जंगलाच्या आश्रयाला जाऊन राहिल्या. त्यामुळे आदिवासींची वस्ती आजही प्रामुख्याने जंगलात, डोंगरदन्यांच्या प्रदेशात आढळून येते.

प्राचीन वन्य टोळ्यांची धार्मिकता आर्यापेक्षा वेगळी होती. त्यांच्या जगण्याच्या एकूणच कल्पना भिन्न होत्या. ते निसर्गाची पूजा करीत. निसर्गातल्या आढळून येणाऱ्या आणि त्यांच्या बुद्धीला न उमगणाऱ्या वस्तूला, वृक्षाला किंवा पक्षाला ते देव मानीत. पूज्य मानलेल्या प्राण्याची शिकार ते करीत नसत. त्यांची ते पूजा करीत. सर्वच आदिवासी टोळ्या निसर्ग आणि प्राणीपुजक होत्या असेच आपल्याला दिसते. प्रत्येक टोळीचा प्रदेश ठरलेला असे. त्यावर समाज आणि टोळीने घातलेली बंधनं असत. बंधने मोडली की संघर्ष होत. ही गोष्ट फार प्राचीन नाही, तर अगदी शे-दोनशे वर्षांपर्यंत म्हणजे गोरा साहेब या देशात येईपर्यत आदिवासींमध्ये अशी समाजरचना अस्तित्वात होती. आदिवासी जमातींचे हे समाज जीवन पाहून त्या काळचे इंग्रज अधिकारी, तत्कालीन धर्मोपदेशक आणि मानववंशशास्रज्ञ फार प्रभावित झाल्याचे त्यांनी केलेल्या नोंदीवरून दिसते.

इंग्रजी राजवट सुरु झाल्यानंतर चित्र हळूहळू बदलत गेले. सरकारी अधिकारी, ख्रिस्ती मिशनरी आणि मानववंशशास्त्रज्ञ या भागात फिरू लागले. शिरगणती करणाऱ्या त्या काळच्या अधिकाऱ्यांना आदिवासींची गणती नेमकी कोणत्या धर्मात करावी, असा प्रश्न पडला होता. हे लोक जरी हिंदुस्थानातले मूळ रहिवासी असले तरी हिंदू धर्मात त्यांचा समावेश झालेला नव्हता. त्या काळातल्या हिंदूंच्या चातुर्वण्य समाज पद्धतीत त्यांना कोठेच स्थान नव्हते. आदिवासींचे सांस्कृतिक आणि धार्मिक जीवन हिंदू लोकांपेक्षा वेगळे होते. त्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांची गणना प्राणी पूजक अशी केली आहे. पुढे जसजशी हिंदूशी सामाजिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली तसे जंगलाच्या या राजाचे हिंदूकरण होऊ लागले किंबहुना झाले.

भारतीय मानवावंशशास्त्रज्ञांनी आदिवासी जमातीची काही ठळक अशी वैशिष्टये सांगितली आहेत. या जमातीचे स्वभाव विशेष नोंदवताना ते म्हणतात की, निसर्गाचं सानिध्य, लहानशा भागात केलेली वस्ती, स्वतंत्र स्वावलंबी आणि अत्यंत साधी राहणी, मोजक्या गरजा, साधी साधने-आयुधे, लिपीचा अभाव, मर्यादित आशा-आकांशा, रुढी, विधी, नातेवाईक, गावकरी यांचा व्यक्तीच्या जीवनावर विशेष प्रभाव दिसून येतो. त्याचबरोबर संकोची आणि बुजरी वृती हीदेखील या समाजाची वैशिष्ट्ये आहेत.

भारतीय स्वातंत्र लढयाच्या इतिहासात बिरसा मुंडा यांनी बंडाचे नेतृत्व केले. यांचे स्थान महत्वपूर्ण आहे. त्यांनी ब्रिटीश सत्तेच्या राजकीय वर्चस्वाबरोबर आर्थिक आणि सामाजिक शोषणालाही आव्हान दिले. या क्रांतिकारकांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशभर निरनिराळ्या ठिकाणी क्रांतीची मशाल पेटवली. याचा फायदा १८५७ च्या उठावात झाला. यात सिद्धू कानहो मुर्मू या दोघा भावांचा प्रमुख सहभाग होता. १८५५ साली झालेल्या संथाळांच्या संग्रामाचे ते प्रमुख शिलेदार होते. त्याची सुरुवात, सध्याच्या झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यात झाली. बाबुराव शेडमाके या गोंड आदिवासी क्रांतिकारकाने त्याच सुमारास महाराष्ट्रात उठाव केला. तसेच नाग्या महादू कातकरी यांनी चिरनेर जंगल सत्याग्रह दिनांक २५ सप्टेंबर १९३० रोजी केला. मध्यप्रदेशात तंट्या भिल्ल यांनी संपूर्ण दशकभर ब्रिटिश राजवटीशी टक्कर दिली. त्यांच्या शौर्याची गाथा तितकीच महत्त्वपूर्ण आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात देशभर अशाच प्रकारचे उठाव झाले. मणिपूरची राणी गायडीनल्यू, रांचीमधील जतरा उरांव, सिक्कीम येथील हेलेन लेपचा, कुर्सेऑगमधील पुतलीमाया देवी तमांग, आंध्र प्रदेशचा अल्लुरी सिताराम राजू, ओरीसामधील लक्ष्मण नायक असे हजारो आदिवासी बंडकरी या सुमारास घडलेल्या क्रांतीयुध्दातील प्रमुख क्रांतिकारक होते.

१९१८ साली गुजरातमधल्या तापी जिल्ह्यात जन्मलेल्या दशरीबेन चौधरी यांची ऐतिहासिक गाथाही प्रेरणादायी आहे. महात्मा गांधींची भेट झाल्यावर त्या अगदी लहान वयात सत्याग्रहात सहभागी झाल्या. जयपाल सिंग मुंडा यांचीही गोष्ट अशीच रोचक आहे. ते हॉकीचे पूर्व कप्तान होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जी संविधान सभा होती, त्यात त्यांनी आदिवासींचे प्रतिनिधित्व केले. आजच्या आदिवासी तरुणांनी संविधान सभेतील जयपाल सिंग मुंडा यांची भाषणे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. एक आदिवासी म्हणून संविधानात त्यांना काय अपेक्षित होते आणि आज ते आदिवासींना मिळत आहे का याचा चिकित्सक अभ्यास झाल्यास आदिवासी चळवळींना योग्य दिशा मिळण्यास नक्की मदत होईल. सध्याच्या गुजरात आणि राजस्थान यांच्या सीमेवर गुरु गोवंद गिरी यांनी भरीव कामगिरी केली. ते सामाजिक आणि धार्मिक सुधारक होते. ते भिल्ल जमातीच्या हक्कांसाठी लढले. आदिवासींमध्ये त्यांनी जे योगदान दिले, त्याचा आजही सन्मानपूर्वक उल्लेख होतो. भगत चळवळ सुरु करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात असिफाबाद हे गाव आहे. तिथल्या कोमाराम भीम याने गोंड आदिवासींचे नेतृत्व करून उठाव केला. बिरसा मुंडा यांच्या उठावाची नोंद तर जगाने घेतलेली आहे. सह्याद्रीतील रामजी भांगरे, राघोजी भांगरे, रामा किरवा, हैबती खाडे, ढवळा आंगरे, रामा डगळे, होनाजी कैंगले, सत्तू मराडे, खेमा नाईक, जावजी बांबळे, ओतुरचे शेळकंदे पाटील, बापू भांगरे, बाळू पिचड, काशिराम किरवे, सखाराम सातपुते यांच्याही ऐतिहासिक बलिदानाची माहिती चिकित्सकपणे समजून घेणे ही काळाची गरज आहे. याचबरोबर १४ व्या शतकात जव्हार येथे राज्य निर्माण करणारे जायबा मुकणे यांचाही इतिहास आपणास माहीत असणे आवश्यक आहे.

सह्याद्रीत असलेली एक प्रमुख जमात म्हणून ठाकर समाज आपली वेगळी ओळख जपून आहे. या जमातीने राघोजी आंगरे यांची कोणतीही माहिती इंग्रज सरकारला देणार नाही अशी सामुदायिक शपथ घेतली होती. हि देखील एक महत्वपूर्ण ऐतिहासिक बाब आहे. याचीही पार्श्वभूमी व महत्व समजुन घेणे तितकेच आवश्यक आहे. खानदेशातील भिल्ल नायकांचे योगदान देखील अतिशय गौरवशाली आहे. सातमाळा प्रदेशातील भिल्लांचा प्रमुख चिल नाईक, जोंधळ्या नाईक, जाकि-या नाईक, सुभान्या नाईक, खाज्या नाईक, भागूजी नाईक, काजीसिंग नाईक अशा अनेक क्रांतिवीरांचे स्वातंत्र्य लढ्‌यातील योगदान जनमाणसात पोहचले त्यासाठी प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे.

वारली उठाव, भिल्ल पोलिस कॉर्प, भिल्ल एजंट, छोटा नागपूर प्रदेशातील आदिवासी विद्रोह, तमार बंड, संथाळ हुल, देवी गुजरात चळवळ, मिदनापुर आदिवासी चळवळ, मालदामधील जितू संथाल चळवळ अशा काही मुख्य वसाहतवाद विरोधी आदिवासी चळवळी व उठाव समजून घेणे आवश्यक आहे.

जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज आपलं भविष्य सुरक्षित करू शकत नाही या उक्तीप्रमाणे आदिवासींनी आता आपल्या इतिहासावर काम करणे अत्यंत आवश्यक आहे. जितके अधिक काम इतिहासावर होईल, तितका अधिक समाज गतिशील होईल यात शंका नाही. आदिवासींकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक योगदानाब‌द्दल जास्तीत जास्त विचार मंथन घडवून आणणे आवश्यक आहे.

आदिवासींमध्ये शैक्षणिक क्रांती हवी असेल तर आवश्यकता आहे शिक्षकांनी जबाबदारी स्वीकारण्याची. केवळ अभ्यासक्रम बदलून क्रांती येणार नाही किंवा मोफत शिक्षण देवूनही क्रांती होणार नाही. शिक्षकांनी वि‌द्यार्थ्यांमध्ये असणारा नेतृत्वगुणांचा अभाव, वाढणारी बेशिस्त, गैरहजेरीचे वाढते प्रमाण, अभ्यासाकडे दुर्लक्ष्य करण्याची प्रवृत्ती, वक्तशीरपणाचा अभाव, अनैतीकपणाचा स्वीकार आणि नेमून दिलेले काम पूर्ण करण्याची वृत्ती यांची कारणे शोधून त्यांच्या उपायांवर लक्ष्य केंद्रित केल्यास खरोखर आपल्या शाळांचा दर्जा तर बदलेलच परंतु या आदिवासी वादळामुळे भविष्यात समाजाचे होणारे नुकसान टळेल.

“आदिवासी मुळ निवासी
नाळ त्यांची अरण्यासी मनस्वी भाबडा सत्यांसी
ओळख जाणे प्रथा परंपरेसी”

(शुभांगी श. कांबळे) वरिष्ठ संशोधन अधिकारी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे विभाग.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सिंहगड संस्थेवर उच्च न्यायालयाचा मोठा दणका! CBI-ED चौकशीचे आदेश; सर्व बँक खाती आणि गुंतवणूक गोठवली

६०.६५ कोटी रुपये देण्याचे न्यायालयाला दिलेले आश्वासन पाळले नाही;...