पायलच्या कुटुंबीयांशी संवाद साधत एकनाथ शिंदे यांची ग्वाही; न्यायालयीन प्रक्रियेपासून वकिलांच्या नियुक्तीपर्यंत शिवसेनेच्या वतीने सर्वतोपरी मदत करणार-प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकारातून संवाद
पुण्यातील पायल झांबरे आत्महत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पायलच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणातील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासनाच्या वतीने आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल, अशी ठाम ग्वाही त्यांनी कुटुंबीयांना दिली. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शासन आणि शिवसेना कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी पैशांची आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. पायलचा भाऊ ऋषिकेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलीस ठाण्यात पती अक्षय झांबरे, सासू मंगल झांबरे, सासरे अरविंद झांबरे आणि नणंद अक्षता झांबरे-निमन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पायलचा पती अक्षय झांबरे, सासू मंगल झांबरे आणि सासरे अरविंद झांबरे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नणंद अक्षता झांबरे-निम्हण हिच्याविरोधातही गुन्हा दाखल असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या संवादादरम्यान पायलच्या कुटुंबीयांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे आणि वेगाने व्हावा तसेच न्याय मिळविण्यासाठी होणारी न्यायालयीन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी, या प्रकरणातील प्रत्येक आरोपीची भूमिका तपासली गेली पाहिजे. कोणत्याही आरोपीला कायद्याच्या कचाट्यातून सुटू दिले जाणार नाही. केवळ कारवाई करून थांबायचे नाही, तर या प्रकरणात न्यायालयात दोष सिद्ध होऊन दोषींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठीही आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे आश्वस्त केले.
यापुढे समाजात पायल झांबरेसारखी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, महिलांचा छळ करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि अशा गुन्ह्यांना आळा बसेल, अशी कठोर शिक्षा दोषींना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पार पडावी, याकरिता आवश्यक त्या सर्व बाबींचा पाठपुरावा करण्यात येईल. कुटुंबीयांना न्यायालयीन लढाई लढताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी तातडीने योग्य वकिलांची नियुक्ती करण्यापासून ते खटल्याच्या संपूर्ण प्रक्रियेपर्यंत शिवसेनेच्या वतीने सर्वतोपरी कायदेशीर व आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी पुढाकार घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पायल झांबरे यांचे आई-वडील व कुटुंबीय यांच्यात हा दूरध्वनीद्वारे संवाद घडवून आणला. या कठीण प्रसंगात पायलच्या कुटुंबीयांना एकटे पडू दिले जाणार नाही. त्यांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना त्यांच्या सोबत राहील आणि न्यायालयीन प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर आवश्यक ती मदत करेल, अशी भूमिका प्रमोद नाना भानगिरे यांनी यावेळी व्यक्त केली.

