जागेच्या मोबदल्यात २.३१ कोटींचे आर्थिक समायोजन
शहर सुधारणा समितीची मान्यता
पुणे, ५ नोव्हेंबर : स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गावरील पद्मावती स्थानकाच्या उभारणीसाठी पुणे महापालिकेची धनकवडी येथील ६६५ चौरस मीटर जागा महामेट्रोला देण्यात येणार आहे. या जागेच्या मूल्यांकनाच्या दुप्पट म्हणजे दोन कोटी ३१ लाख ५५ हजार रुपये महापालिकेच्या आर्थिक दायित्वात समायोजित केले जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने मान्यता दिली असून, अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेकडे शिफारस करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
धनकवडी येथील सर्वे क्रमांक १९ अ/४ अ आणि ब मधील ट्रक टर्मिनससाठी आरक्षित जागेवर पद्मावती मेट्रो स्थानक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महामेट्रोने महापालिकेकडे जागेची मागणी केली होती. या जागेचे मूल्यांकन एक कोटी १५ लाख ७७ हजार ६०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्याच्या दुप्पट रक्कम महामेट्रोकडून महापालिकेच्या आर्थिक दायित्वात समायोजित करण्याचा निर्णय प्रस्तावित आहे.
या जागेवरील भूखंड क्रमांक आठ, नऊ आणि दहा महामेट्रोला हस्तांतरित करण्यात येणार आहेत. त्यापैकी भूखंड क्रमांक आठचे मूळ भाडेपट्टाधारक सय्यद शेरअली सय्यद मेहबूब आणि भूखंड क्रमांक दहाचे मूळ भाडेपट्टाधारक दिवंगत सतीश शिवाजीराव पाटील यांच्या वारसांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी कोंढवा बुद्रुक येथे अनुक्रमे २२५ आणि २२० चौरस मीटर जागा देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
भूखंड क्रमांक नऊचे भाडेपट्टाधारक रवींद्र छोटूसिंग निवते यांनी महापालिकेच्या परवानगीशिवाय जागेचे हस्तांतरण केल्याचे तसेच जागेच्या वापरात बदल केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे भाडेपट्टा करारातील अटींचा भंग झाल्याने संपूर्ण प्रीमियम रक्कम जमा करून करार रद्द करणे आणि भूखंडाचा ताबा महापालिकेने परत घेण्याची शिफारस करण्यात आली आहे.
शहर सुधारणा समितीच्या ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. मुख्य सभेची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित भूखंड महामेट्रोला मालकी हक्काने हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
बसपासच्या प्रतिपूर्तीसाठी पीएमपीला २३ कोटी ११ लाख
३४.८७ कोटींच्या देयकाची शिफारस
उर्वरित ११.७७ कोटींसाठी तरतूद अपुरी
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि महापालिका कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोफत व सवलतीच्या बसपासपोटी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) २३ कोटी ११ लाख रुपये देण्यात येणार आहेत. पीएमपीने सादर केलेल्या बिलांची तपासणी करून महापालिकेच्या विविध विभागांनी ३४ कोटी ८७ लाख रुपयांची शिफारस केली आहे. मात्र, अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद नसल्याने सध्या २३ कोटी ११ लाख रुपये देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
पीएमपीकडून महापालिकेच्या विविध योजनांतर्गत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि महापालिका कर्मचाऱ्यांना मोफत अथवा सवलतीच्या दरात बसपास दिले जातात. या सवलतींची रक्कम महापालिकेकडून पीएमपीला दिली जाते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील बसपासपोटी पीएमपीने ३६ कोटी १८ लाख ४० हजार रुपयांची मागणी केली होती. त्याची संबंधित विभागांकडून तपासणी केल्यानंतर ३४ कोटी ८७ लाख ५५ हजार रुपये देण्याची शिफारस करण्यात आली.
यामध्ये विद्यार्थ्यांचे वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि ५० टक्के सवलतीचे पास, ज्येष्ठ नागरिकांचे पास, स्वातंत्र्यसैनिकांचे मोफत पास, विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचे पास आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या पासचा समावेश आहे. दैनिक व साप्ताहिक वर्तमानपत्रांच्या वार्ताहरांना दिलेल्या मोफत बसपासपोटी ७१ हजार ३०० रुपये देण्याची शिफारस माहिती व जनसंपर्क कार्यालयाने केली आहे.
दरम्यान, २२ दिवसांच्या प्रवासी पंचिंग पासपोटी पीएमपीने मागणी केलेल्या एक कोटी २७ लाख रुपयांची शिफारस संबंधित विभागांनी केलेली नाही. त्यामुळे पीएमपीची मागणी आणि महापालिकेने तपासणीनंतर निश्चित केलेल्या रकमेत तफावत आहे.
पीएमपीने दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि बक्षीस देण्यासाठी ३३ कोटी रुपये आगाऊ देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता.
महापालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बसपासच्या प्रतिपूर्तीसाठी २३ कोटी ११ लाख रुपयांची तरतूद आहे. त्यामुळे शिफारस केलेल्या रकमेपैकी सुमारे ११ कोटी ७७ लाख रुपये देण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता भासणार आहे. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर उपलब्ध तरतुदीतून पीएमपीला रक्कम दिली जाणार आहे.

