कार्यकारी संचालकांकडून पुणे परिमंडलात वीजबिल वसुलीसाठी आकस्मिक भेटी
पुणे, दि. १ नोव्हेंबर २०२६ : वीजबिलाच्या थकबाकीपोटी खंडित केलेली वीजजोडणी चालू वीजबिलासह संपूर्ण थकबाकी भरल्याशिवाय पूर्ववत करू नये, अशा सक्त सूचना महावितरणचे कार्यकारी संचालक (वीज खरेदी) दिनेश अग्रवाल यांनी दिल्या. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी विश्रांतवाडी आणि वाडिया उपविभागांना आकस्मिक भेटी देऊन थकबाकीदारांच्या खंडित वीजजोडण्यांची पडताळणी केली.
वाडिया उपविभागातील मे. फिस्टहाऊस हॉस्पिटॅलिटी आणि प्रभावती नामदेव पिंगळे या दोन थकबाकीदारांच्या वीजजोडण्यांची त्यांनी तपासणी केली. या ग्राहकांकडे अनुक्रमे ७ लाख ६९ हजार रुपये आणि ५ लाख ४४ हजार रुपये थकबाकी होती. मे. फिस्टहाऊस हॉस्पिटॅलिटी या ग्राहकाकडून हप्त्यांमध्ये रक्कम भरली जात असल्याने थकबाकी कायम राहत असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकरणांत चालू वीजबिलासह संपूर्ण देय रक्कम वसूल झाल्यानंतरच वीजजोडणी पूर्ववत करावी, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
वीजबिल वसुलीची कार्यवाही केवळ कार्यालयीन स्तरावर मर्यादित न ठेवता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून तिचा आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी थकबाकी वसुलीसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांना अधिक गती देऊन चालू वीजबिलासह थकबाकी वसूल करण्याचे निर्देश दिले.
वीजग्राहकांना सेवा देणे ही महावितरणची जबाबदारी आहे, तर वेळेत वीजबिल भरणे हे ग्राहकांचे कर्तव्य आहे. ग्राहकांमध्ये नियमित वीजबिल भरण्याची सवय निर्माण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करावा. थकबाकी वाढण्यापूर्वीच नियमानुसार वीजपुरवठा खंडित केल्यास सुरक्षा ठेवीतून थकीत रक्कम वळती करण्याची वेळ येणार नाही, असेही अग्रवाल यांनी नमूद केले.
या पाहणीवेळी प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदिले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोदकुमार गायकवाड आणि अमिता देशमुख उपस्थित होते.

