पुण्यातील लक्ष्मी, कुमठेकर आणि बाजीराव रस्ते विद्युत रोषणाईने उजळले; आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते उद्घाटन, मात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जगण्याची चिंता कायम
पुणे, ३० ऑक्टोबर २०२६ | माय मराठी विशेष वृत्त
इकडे दिव्यांची झळाळी, तिकडे पाण्यासाठी धडपडणारी शिवारं ! एकीकडे पुण्याच्या पारंपरिक बाजारपेठा दिवाळीच्या रोषणाईने उजळून निघाल्या आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांसमोर पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्न उभे आहेत.
या दोन वेगवेगळ्या वास्तवांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि बाजीराव रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईचे उद्घाटन गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे व्यापारी महासंघ, युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएशन आणि पुणे सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
तीन किलोमीटर परिसरात दिव्यांचा लखलखाट
पुण्याच्या मध्यवर्ती बाजारपेठांमधील सुमारे तीन किलोमीटरचा परिसर दिव्यांच्या माळांनी सजविण्यात आला आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना असलेल्या व्यापारी इमारती, दुकानांचे दर्शनी भाग आणि रस्त्यांवरील विद्युत रोषणाई यामुळे बाजारपेठांचे रूप पालटले आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना उत्सवी वातावरणाचा अनुभव मिळावा, पारंपरिक बाजारपेठांना चालना मिळावी आणि पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे व्यापारी संघटनांनी सांगितले.
‘पारंपरिक बाजारपेठा ही पुण्याची ओळख’ — आयुक्त
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
पुणे ही सांस्कृतिक राजधानी असून शहरातील पारंपरिक बाजारपेठांचे महत्त्व आजही कायम आहे, असे त्यांनी सांगितले. केवळ मॉलमधील खरेदीपेक्षा शहरातील रस्ते, दुकाने आणि खाद्यसंस्कृती अनुभवण्याची वेगळी मजा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाप्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी घेतलेला पुढाकार स्वागतार्ह असल्याचे ते म्हणाले.
संकटाच्या काळात पुण्यातील व्यापारी संघटना मदतीसाठी पुढे येतात, याचाही त्यांनी उल्लेख केला.
‘व्यापाऱ्यांचा सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न’
युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएशनचे सचिव मिलिंद शालगर यांनी या उपक्रमामागील भूमिका मांडली.
पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेत व्यापाऱ्यांचे योगदान असून, दिवाळीच्या काळात बाजारपेठांमधील उत्साह वाढावा आणि नागरिकांना आनंददायी खरेदीचा अनुभव मिळावा म्हणून व्यापारी संघटनांनी संयुक्तपणे रोषणाई सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
पण शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश कधी?
पुण्यातील बाजारपेठांच्या झगमगाटाचे चित्र उत्साहवर्धक असले, तरी राज्यातील दुष्काळग्रस्त भागांचे वास्तव वेगळे आहे.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शेतीसाठी पाणी, जनावरांची देखभाल आणि उपजीविकेची चिंता आहे. अशा परिस्थितीत सण साजरा करताना संकटग्रस्त समाजघटकांचीही जाणीव ठेवण्याची गरज आहे.
शहरातील रोषणाईचा आनंद आणि शिवारातील पाणीटंचाईची चिंता या दोन गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात आहेत. म्हणूनच दिवाळीच्या उत्साहाबरोबर सामाजिक बांधिलकीचाही विचार व्हायला हवा.
रोषणाई व्यापारी संघटनांची
या उपक्रमाचे आयोजन व्यापारी संघटनांनी केले आहे.आयोजकांनी रोषणाईचा एकूण खर्च किंवा निधीचा तपशील .आणि दुष्काळ ग्रस्तांना दिलेली मदत जाहीर केलेला नाही.त्यामुळे हा सणाचा आनंद आणि दुष्काळग्रस्तांप्रती सामाजिक जबाबदारी या दृष्टिकोनातून पाहणे अधिक योग्य ठरेल.
उत्सवही हवा, संवेदनशीलताही हवी!
दिवाळीचा उत्सव, बाजारपेठांतील खरेदी आणि सांस्कृतिक परंपरा यांना स्वतःचे महत्त्व आहे. त्याच वेळी दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांच्या मदतीसाठी शासनाबरोबर सामाजिक संस्थांनी व व्यापारी संघटनांनी पुढाकार घेण्याचीही संधी आहे.
आयुक्तांनी व्यापारी संघटना संकटात मदतीला धावून येतात, असे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागांसाठी पाणी, चारा किंवा अन्य मदतकार्याचे उपक्रमही राबवले जातील का, हा प्रश्न उपस्थित होतो.
इकडे दिवाळीच्या रोषणाईने बाजारपेठा उजळल्या आहेत; तिकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आयुष्यातही दिलाशाचा प्रकाश पोहोचावा, हीच अपेक्षा!
दिवाळीचा झगमगाट साजरा करताना दुष्काळाचा आघात सहन करणाऱ्यांना विसरून चालणार नाही.

