पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपने संघटनात्मक तयारीवर विशेष भर दिला होता. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्याकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती, तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रभारीपदाची धुरा होती.शिक्षक मतदार संघातील विजयासाठी चंद्रकांत दादांना श्रेय दिले जात आहे . शिक्षक मतदार संघातील विजयानंतर कौस्तुभ गावडे यांनी तातडीने मंत्री चंद्रकांत दादा यांची भेट घेत त्यांनी विशेष मेहनत घेतल्याचे स्पष्ट कलेले आहे .
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासारख्या संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या राजकीय व संघटनात्मक प्रयत्नांशी राजेश पांडे यांचे नाव जोडले गेले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील दोन्ही विधान परिषद जागा जिंकण्यासाठी पक्षाने त्यांच्या संघटनात्मक अनुभवावर विश्वास दाखवला होता.
निवडणुकीपूर्वी राजेश पांडे यांनी महायुतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्ष निकालात भाजपला शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांच्या रूपाने विजय मिळाला, तर प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्याकडून ९ हजार ९२८ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
या संमिश्र निकालामुळे भाजपच्या निवडणूक नियोजनाची आणि पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, शिक्षक मतदारसंघातील विजयाचा मोठा जल्लोष करण्याऐवजी पक्षाच्या शहर कार्यालयात साधेपणाने सत्कार करण्यात आला .
पदवीधर मतदारसंघात अपेक्षित यश का मिळाले नाही , मतदार नोंदणी आणि मतदानाच्या दिवशीची संघटनात्मक यंत्रणा कितपत प्रभावी ठरली, तसेच उमेदवार निवडीचा निकालावर काय परिणाम झाला काय ? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
त्यामुळे पुणे विभागातील एक विजय आणि एक पराभव या निकालाचा भाजप नेतृत्व नेमका कोणत्या पद्धतीने आढावा घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.

