१ जुलै २०२६ पासून वाढ लागू; ४८.५४ लाख कर्मचारी आणि ६८.७१ लाख निवृत्तीवेतनधारकांना लाभ
नवी दिल्ली, २८ ऑक्टोबर २०२६ : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) यामध्ये ३ टक्क्यांची वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या मूळ वेतन किंवा निवृत्तीवेतनाच्या ६० टक्के असलेला महागाई भत्ता आता ६३ टक्के होणार आहे.
ही वाढ १ जुलै २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार असल्याने पात्र कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना वाढीव रकमेचा लाभ मिळणार आहे.
तब्बल १ कोटी १७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना फायदा
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचा लाभ सुमारे ४८.५४ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८.७१ लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. अशा प्रकारे एकूण १ कोटी १७ लाख २५ हजार लाभार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
महागाई भत्ता आणि महागाई दिलासा वाढीमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी १०,०१६.१० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होणार?
महागाई भत्त्यातील तीन टक्के वाढ मूळ वेतनावर लागू होणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ मासिक वेतन ३० हजार रुपये असल्यास त्याच्या महागाई भत्त्यात दरमहा ९०० रुपयांची वाढ होईल. मूळ वेतन ५० हजार रुपये असल्यास ही वाढ दरमहा १,५०० रुपये असेल.
निवृत्तीवेतनधारकांनाही त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनाच्या आधारे वाढीव महागाई दिलासा मिळणार आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार निर्णय
केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानुसार, महागाई भत्ता आणि महागाई दिलास्यातील ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित मान्यताप्राप्त सूत्रानुसार करण्यात आली आहे.
वाढत्या महागाईचा कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांवर होणारा आर्थिक परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
माय मराठी | महाराष्ट्राचा आवाज जगभर

